T20 World Cup 2024 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाची महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ नंतर ५ दिवसांनी अमेरिका व वेस्ट इंडिज येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे भारताच्या पहिल्या बॅचचे खेळाडू अमेरिकेला लवकर पोहोचणार आहेत. त्यामुळे १ जूनला भारत-बांगलादेश या सराव सामन्यात ते खेळतील. पण, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्यासह संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल व युझवेंद्र चहल हेही सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२४ची फायनल आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यांच्यात कमीच गॅप आहे आणि त्यामुळे भारतीय संघाला एकमेव सराव सामना १ जूनला बांगलादेशविरुद्ध खेळता येणार आहे. भारताचा साखळी फेरीतील पहिला सामना ५ जून आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यामुळे अमेरिकेत जे खेळाडू उशीराने दाखल होतील, त्यांना या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय खेळाडूंना पुरेसा वेळ मिळणार नाही.
भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी २५ मे रोजी मध्यरात्री अमेरिकेला पोहोचेल. जे स्टार आयपीएल फायनलमध्ये खेळणार नाहीत ते रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासोबत पहिल्या तुकडीत असतील. भारताची दुसरी तुकडी २८ मे रोजी न्यूयॉर्कमध्ये पोहोचेल, त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यास फारसा वेळ मिळणार नाही. कारण, वेळेतील फरक. त्यामुळे, दुसऱ्या तुकडीतून अमेरिकेत दाखल होणाऱ्या खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाट्यमय पद्धतीने प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. जर ते एलिमिनेटर १ जिंकल्यास ते २४ मे रोजी क्वालिफायर २ खेळतील. त्यामुळे विराट कोहली व मोहम्मद सिराज RCB सोबत आयपीएल खेळायला थांबतील आणि मग ते २७ मे च्या मध्यरात्री अमेरिकेसाठी प्रवास सुरू करतील. जर एलिमिनेटरमध्ये बंगळुरूचा पराभव झाला, तर विराट व सिराज पहिल्या बॅचसोबत २५ मे रोजीच प्रवास करतील.
आयपीएल संपल्यानंतर विराट व सिराजने प्रवास केला, तर ते २९ मे रोजी अमेरिकेत पोहोचतील आणि त्यांना सराव सामन्यापूर्वी फक्त दोन दिवस विश्रांतीसाठी मिळतात. अशा परिस्थितीत त्यांना सराव सामन्यात न खेळवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेतील. भारत आणि न्यू यॉर्क यांच्यात ९.५ तासांचा वेळेचा फरक आहे. संजू सॅमसन, युझवेंद्र चहल आणि यशस्वी जैस्वाल यांच्याबाबतीतही हेच गणित आहे.