T20 World Cup, England vs Afghanistan Live : इंग्लंडच्या गोलंदाजांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात कमाल केली. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ ११२ धावांवर त्यांनी तंबूत पाठवला. सॅम कुरनने १० धावांत ५ व विकेट्स घेत इतिहास रचला.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवले. बेन स्टोक्स, सॅम कुरन व मार्क वूड यांनी १पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या. नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि स्टोक्स व वूड यांनी तो योग्य ठरवला. हझरतुल्लाह झझाई ( ७) व रहमनुल्लाह गुर्बाझ ( १०) हे लगेच माघारी परतले. पण, इब्राहिम झाद्रान व उस्मान घानी यांनी अफगाणिस्तानच्या डावाला आकार दिला. सॅमने ही जोडी तोडताना झाद्रानला ३२ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. त्यांतर पुन्हा अफगाणिस्ताच्या फलंदाजांनी रांग लावली.
नजिबुल्लाह झाद्रानने १३ धावा केल्या, परंतु तळाच्या कोणत्याच खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सॅम कुरनने १८व्या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्याने तो २०व्या षटकात पहिल्या चेंडूवर हॅटट्रिकच्या प्रयत्नात होता. ती पूर्ण झाली नाही. मात्र त्याने अखेरच्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. घानीने ३० धावांचे योगदान दिले. बेन स्टोक्सने ४-०-१९-२, मार्क वूडने ४-०-२३-२ व ख्रिस वोक्सने ४-०-२४-१ अशी कामगिरी केली. सॅम कुरनने ३.४ षटकांत १० धावांत ५ विकेट्स घेत इतिहास रचला. ट्वेंटी-२० सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"