T20 World Cup, England vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप १ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही संघाला जेतेपद कायम राखता आले नाही आणि यजमानांनाही बाजी मारता आलेली. तेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध घडले. इंग्लंडने ४ विकेट्सने श्रीलंकेवर विजय मिळवला आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे पॅकअप झाले. इंग्लंड आयसीसी स्पर्धांमध्ये सलग पाचव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचली आहे. आता उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे आणि रोहित अँड कंपनीची कसोटी लागणार आहे.
- २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची फायनल
- २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी सेमी फायनल
- २०१९ वन डे वर्ल्ड कप चॅम्पियन
- २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरी
पथूम निसंका आणि कुसल मेंडिस यांनी दमदार सुरुवात केली. यंदाच्या स्पर्धेत सर्वात वेगवान मारा करणाऱ्या मार्क वूडला या दोघांनी चोपून काढले. चौथ्या षटकात ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याच्या प्रयत्नात मेंडिस ( १८) झेलबाद झाला. निसंका काही थांबता थांबेना आणि त्याने सॅम कुरनच्या पुढील षटकात चौकार-षटकार खेचले. निसंका ४५ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ६७ धावांवर बाद झाला. निसंकाच्या विकेटनंतर इंग्लंडने कमबॅक केले आणि श्रीलंकेला धक्के दिले. श्रीलंकेला ८ बाद १४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. मार्क वूडने ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात जोस बटलर ( २८) व ॲलेक्स हेल्स यांनी ७५ धावांची भागीदारी करून इंग्लंडला दमदार सुरूवात करून दिली. हेल्स ३० चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ४७ धावांवर माघारी परतला. हॅरी ब्रुक ( ४) याला धनंजयाने माघारी पाठवले. लिएम लिव्हिंगस्टोन ( ४) व मोईन अली ( १) यांना अनुक्रमे लाहिरू कुमारा व धनंयजाने माघारी पाठवल्याने इंग्लंडची अवस्था ५ बाद १११ अशी झाली. पण, बेन स्टोक्स अखेरपर्यंत खेळला अन् नाबाद ४२ धावा करताना इंग्लंडचा विजय पक्का केला. इंग्लंडने ६ बाद १४४ धावा केल्या.
- ग्रुप १मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्या प्रत्येकाच्या खात्यात ७ गुण आहेत. पण, नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंडने ग्रुप १ मध्ये अव्वल व इंग्लंडने दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडचा नेट रन रेट हा +२.११३ इतका आहे, तर इंग्लंडचा +०.४७३ इतका आहे. ऑस्ट्रेलियाचा -०.१७३ असा नेट रन रेट आहे.
- आता ग्रुप २ मध्ये भारत व दक्षिण आफ्रिका या हे उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. भारत ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि उद्या झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवून ते ८ गुण व अव्वल स्थानासहच उपांत्य फेरीत पोहोचतील.
- ५ गुण असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा अखेरचा सामना नेदरलँड्सविरुद्ध आहे आणि त्यात विजय मिळवला तर त्यांचे ७ गुण होतील. अशात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि भारत विरुद्ध इंग्लंड अशा सेमी फायनलच्या लढती होतील.
- भारत-इंग्लंड सेमी फायनल झाल्यात ती १० नोव्हेंबरला एडिलेडवर दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होईल. न्यूझीलंड- आफ्रिका उपांत्य फेरीची लढत ९ नोव्हेंबरला सिडनीवर होईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"