T20 World Cup, England vs New Zealand Semi Final Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज इंग्लंड-न्यूझीलंड हे भिडणार आहेत. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये रंगलेल्या थरारनाट्यानंतर पुन्हा हे संघ आयसीसीच्या स्पर्धेत समोरासमोर आले आहेत आणि त्यामुळे आजही नाट्यमय लढत पाहायला मिळेल असा अंदाज आहे. पण, एक प्रश्न चाहत्यांना सतावतोय आणि तो म्हणजे जर २०१९च्या वन डे वर्ल्ड कप फायनल सारखी परिस्थिती आज निर्माण झाली, तर विजेता ठरणार कसा?. २०१९च्या फायनलमध्ये सर्वाधिक चौकाराच्या नियमानुसार आयसीसीनं इंग्लंडला विजयी घोषित केलं होतं, परंतु त्यानंतर जोरदार टीका झाली आणि आयसीसीला नियम बदलावा लागला. तिच परिस्थिती आज उद्भवल्यास, त्या नियमाचा कोणाला व कसा फायदा होईल, हे जाणून घेऊया...
इंग्लंडनं ग्रुप १मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर न्यूझीलंडनं ग्रुप २ मधून दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरी गाठली. इंग्लंड-न्यूझीलंड पुन्ही भिडणार असल्यानं चाहत्यांच्या डोळ्यासमोर २०१९चा वर्ल्ड कप उभा राहिला. त्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या ८ बाद २४१ च्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं सर्वबाद २४१ धावा केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्सनं ५५ धावा केल्या, तर इंग्लंडच्या क्रिस वोक्सनं ३७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडकडून बेन स्टोक्स ( नाबाद ८४), जोस बटलर ( ५९) यांनी दमदार खेळ केला. सुपर ओव्हमध्ये दोन्ही संघांना १५-१५ धावा करता आल्या आणि सर्वाधिक चौकार मारणाऱ्या इंग्लंडला विजयी घोषित केलं गेलं.
काय सांगतो नवा नियम? ICCच्या एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. ही सुपर ओव्हरही टाय झाली तर पुन्हा ती खेळवण्यात येईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल.