T20 World Cup, England vs New Zealand Semi Final Live Updates : डेव्हिड मलान ( Dawid Malan) आणि मोईन अली ( Moeen Ali) यांनी इंग्लंडला आव्हानात्मक लक्ष्य उभं केलं. जेसन रॉयच्या अनुपस्थितीत जॉनी बेअरस्टो व जॉस बटलर ही जोडी सलामीला आली, परंतु त्यांना साजेशी सुरूवात करून देता आली नाही. फॉर्मात असलेला बटलरही आज अपयशी ठरला, परंतु संपूर्ण स्पर्धेत काही खास करू न शकलेला मलान मोक्याच्या सामन्यात खेळला. त्याला अलीची साथ लाभली. नशीबाचीही त्यांना साथ मिळाली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं गोलंदाजांचा सुरेख वापर करताना धावगती रोखण्याचा प्रयत्न केला. पण, अलीनं सुसाट खेळ करताना अखेपर्यंत झुंज दिली. इंग्लंडला पहिल्या षटकारासाठी १६व्या षटकापर्यंत प्रतीक्षा पाहावी लागली.
२०१९च्या वन डे वर्ल्ड कप फायनलनंतर आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच समोरासमोर आलेल्या न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातला सामना चुरशीचा होताना दिसतोय. जेसन रॉयच्या दुखापतीमुळे इंग्लंडला धक्का बसलाच होता, त्यात नाणेफेकीचा कौलही त्यांच्या विरोधात गेला. केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जेसन रॉयच्या जागी इंग्लंडनं आज सॅम बिलिंगला संधी दिली, परंतु सलामीला जॉनी बेअरस्टो व जॉस बटलर ही जोडी आली. त्यांनी सुरूवातीला संयमी खेळ करून तग धरला, परंतु किवी कर्णधार विलियम्सनच्या अफलातून कॅचनं ही जोडी तोडली. सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अॅडम मिल्नेनं किवींना पहिले यश मिळवून दिले, विलियम्सननं मिड ऑफला बेअरस्टोचा ( १३) भन्नाट कॅच घेतला.
१६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं टीम साऊदीनं टाकलेला चेंडू सीमापार भिरकावला, परंतु पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. साऊदीनं २४ धावांत १ विकेट घेतली. त्यानंतर मोईन अलीनं फटकेबाजीला सुरुवात केली. मलान व अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. अली व लिएम लिव्हिंगस्टोननं धावांचा वेग वाढवताना चौथ्या विकेटसाठी २३ चेंडूंत ४० धावा कुटल्या. अलीनं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. अली ३७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडनं ४ बाद १६६ धावा केल्या.