Join us  

T20 World Cup, ENG vs SL : टॉस हरूनही जिंकता येतो सामना; इंग्लंडनं मिळवला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान, जोस बटलर ठरला शिल्पकार!

T20 World Cup, England vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१त इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 11:14 PM

Open in App

T20 World Cup, England vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१तइंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. इंग्लंडनं ग्रुप १ मध्ये विजयाचा चौकार खेचताना हा पराक्रम केला. श्रीलंकेचा चार सामन्यातील तिसरा पराभव ठरला आणि ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाले. इंग्लंडच्या फलंदाजांनी निराश केले, परंतु जॉस बटलर ( Jose Buttler) नं सर्वांची उणीव भरून काढली. त्याला कर्णधार इयॉन मॉर्गनची उत्तम साथ मिळाली. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली. बटलरनं फलंदाजीसोबतच यष्टिंमागेही दमदार कामगिरी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. इयॉन मॉर्गनचा हा कर्णधार म्हणून ट्वेंटी-२०तील ४३वा विजय ठरला.  यासह त्यानं महेंद्रसिंग धोनी व असघर अफघान यांचा ४२ विजयांचा विक्रम मोडला. 

नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवातही  खराब झाली. मात्र, ते खचले नाही आणि जोरदार मुसंडी मारून श्रीलंकेसमोर ४ बाद १६३ धावा उभ्या केल्या. जेसन रॉय व जॉस बटलर ही जोडी खेळपट्टीवर उतरली आणि श्रीलंकेनं त्यांचा फॉर्मात असलेला गोलंदाज मैदानावर उतरवला. वनिंदू हसरंगानं दुसऱ्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. रॉय ( ९) त्रिफळाचीत झाला. डेव्हिड मलानला प्रमोशन दिलं गेलं, परंतु दुष्मंथा चमिरानं त्याला ६ धावांवर बाद केलं. जॉनी बेअरस्टो भोपळ्यावर हसरंगाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. इंग्लंडचे ३ फलंदाज ३५ धावांवर माघारी परतले होते. इयॉन मॉर्गननं ३६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकार खेचून ४० धावा करताना आत्मविश्वास कमावला.  बटलरनं अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून ट्वेंटी-२० तील पहिले शतक झळकावलं. त्यानं ६७ चेंडूंत नाबाद १०१ धावा केल्या आणि त्यात ६ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता. 

प्रत्युत्तरात पथूम निसंका ( १) व कुसल परेरा ( ७) हे दोन्ही सलामीवीर झटपट माघारी परतले. चरिथ असलंका ( २१), अविष्का फर्नांडो ( १३) आणि भानुका राजपक्षा ( २६) यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांचा निम्मा संघ ७६ धावांवर माघारी पाठवला. आदील राशिदनं ४ षटकांत १९ धावांत २ विकेट्स घेतल्या. दासून शनाका व हसरंगा यांनी संयमी खेळ करताना श्रीलंकेच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. श्रीलंकेला ३० चेंडूंत ५१ धावाच करायच्या होत्या. ख्रिस जॉर्डननं टाकलेल्या १६व्या षटकात श्रीलंकेनं १० धावा केल्या. हसरंगा चतुराईनं फटकेबाजी करताना दिसला. 

मोईन अलीची दोन षटकं शिल्लक असताना १७वे षटक लिएल लिव्हिंगस्टनला दिले. पहिल्या चार चेंडूंवर ०, १, १ ४ अशा धावा दिल्यानंतर लिव्हिंगस्टननं इंग्लंडला यश मिळवून दिलं. हसरंगानं टोलावलेला चेंडू सीमारेषेवर बिलिंग्स व जेसन रॉय या जोडीनं टीपला. रॉयनं चेंडू झेलला पण तोल जात असल्याचे पाहून त्यानं चेंडू बिलंग्सकडे सोपवला व हसरंगाला ३४ धावांवर माघारी जावं लागलं. लिव्हिंगस्टननं त्या षटकात ७ धावा दिल्या व १ विकेट घेतली. पुढच्या षटकात शनाका ( २६) धावबाद झाला अन् श्रीलंकेनं तिथंच सामना गमावला. ख्रिस जॉर्डनच्या त्या षटकात दुष्मंथा चमिरा ( ४) झेलबाद झाला. श्रीलंकेला १२ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या. मोईन अलीनं १९व्या षटकात दोन विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव १३७ धावांवर गुंडाळला. इंग्लंडनं २६ धावांनी हा सामना जिंकला. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१इंग्लंडश्रीलंका
Open in App