T20 World Cup, England vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप १ मधून न्यूझीलंडने उपांत्य फेरीचे तिकिट पक्के केले होते. पण, दुसऱ्या स्थानासाठी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया शर्यतीत होते. इंग्लंडने आज श्रीलंकेचा पराभव केला व गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे पॅकअप झाले. श्रीलंकेने त्यांना सहजासहजी हा विजय मिळवू दिला नाही. बेन स्टोक्सने ( Ben Stokes) अखेरपर्यंत झुंज देताना इंग्लंडला विजय मिळवून दिला आणि ग्रुप १ मधून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. ग्रुप २ मधील अव्वल संघाशी त्यांचा मुकाबला होणार आहे आणि उद्या भारत जिंकल्यास India vs England अशी सेमी फायनल होण्याची शक्यता अधिक आहे.
पथूम निसंका आणि कुसल मेंडिस यांनी दमदार सुरुवात केली. यंदाच्या स्पर्धेत सर्वात वेगवान मारा करणाऱ्या मार्क वूडला या दोघांनी चोपून काढले. चौथ्या षटकात ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याच्या प्रयत्नात मेंडिस ( १८) झेलबाद झाला. निसंका काही थांबता थांबेना आणि त्याने सॅम कुरनच्या पुढील षटकात चौकार-षटकार खेचले. निसंका ४५ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ६७ धावांवर बाद झाला. निसंकाच्या विकेटनंतर इंग्लंडने कमबॅक केले आणि श्रीलंकेला धक्के दिले. श्रीलंकेला ८ बाद १४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. मार्क वूडने ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी ७५ धावांची भागीदारी करून इंग्लंडला दमदार सुरूवात करून दिली. महिष थिक्साना व वनिंदू हसरंगा यांनी फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवले, परंतु इंग्लंडकडून चतुर खेळ झाला. वनिंदूने इंग्लंडला पहिला धक्का देताना कर्णधार बटलरची ( २८) विकेट घेतली. ७५ धावांवर इंग्लंडची पहिली विकेट पडली. डेवीड मलान दुखापतग्रस्त झाल्याने बेन स्टोक्स आघाडीवर फलंदाजीला आला. वनिंदूने इंग्लंडचा दुसरा सेट फलंदाज माघारी पाठवला. हेल्स ३० चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ४७ धावांवर माघारी परतला. हॅरी ब्रुक ( ४) याला धनंजयाने माघारी पाठवले. लिएम लिव्हिंगस्टोन ( ४) व मोईन अली ( १) यांना अनुक्रमे लाहिरू कुमारा व धनंयजाने माघारी पाठवल्याने इंग्लंडची अवस्था ५ बाद १११ अशी झाली
१८ चेंडूंत १५ धावांची गरज असताना सॅम कुरन व बेन स्टोक्स खिंड लढवत होते, परंतु लाहिरू कुमाराने २ धावा देताना कुरणची ( ६) विकेट घेतली. आता त्यांना १२ चेंडूंत १३ धावा हव्या होत्या. बेन स्टोक्सवरच इंग्लंडच्या आशा होत्या, परंतु श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ६ चेंडू ५ धावा असा सामना अटीतटीचा बनला होता. स्टोक्सने पहिल्याच चेंडूवर २ धावा काढल्या आणि त्यानंतर वोक्सने चौकार खेचून ४ विकेट्सने विजय मिळवला. स्टोक्स ४२ धावांवर नाबाद राहिला. इग्लंडने ६ बाद १४४ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup, ENG vs SL : England have joined New Zealand as the 2nd Semi Finalist, Defending champions Australia have failed to qualify for Semi Finals in Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.