T20 World Cup: इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक; श्रीलंकेचा २६ धावांनी पराभव

संघ अडचणीत असतान जोस बटलरने झळकावलेले नाबाद शतक इंग्लंडच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:18 AM2021-11-02T05:18:42+5:302021-11-02T05:19:39+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup: England in the semi-finals; Sri Lanka lost by 26 runs | T20 World Cup: इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक; श्रीलंकेचा २६ धावांनी पराभव

T20 World Cup: इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक; श्रीलंकेचा २६ धावांनी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजा : यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहचणारा पहिला संघ असा मान मिळवत इंग्लंडने ग्रुप-१ गटात श्रीलंकेचा २६ धावांनी पराभव केला. सलग चौथा विजय मिळताना इंग्लंडने दिमाखदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करत ४ बाद १६३ धावांची मजल मारलेल्या इंग्लंडने लंकेला १९ षटकांत १३७ धावांमध्ये गुंडाळले. 

संघ अडचणीत असतान जोस बटलरने झळकावलेले नाबाद शतक इंग्लंडच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. त्याच्या धडाकेबाज फटकेबाजीनंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी लंकेला जबर धक्के दिले. लंकेचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीने प्रतिकार करत इंग्लंडला सहजासहजी विजय मिळवू दिला नाही. फिरकीपटू आदिल राशिद, मोइन अली आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी २ बळी घेत लंकेला नमवले.  

तत्पूर्वी, बटलरच्या झंझावाती शतकाच्या जोरावर इंग्लंडने अडखळत्या सुरुवातीनंतरही आव्हानात्मक मजल मारली. जेसन रॉय (९), डेव्हिड मलान (६) व जॉनी बेयरस्टो (०) हे स्वस्तात बाद झाल्याने इंग्लंड संघ जबरदस्त दबावात आला. त्यांची धावगतीही ६ हून कमी झाली होती. बटलरने सावध पवित्रा घेत कर्णधार इयॉन मॉर्गनसह संघाची पडझड रोखली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी केली. 

जम बसताच बटलरने लंकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने ६७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांचा पाऊस पाडत नाबाद १०१ धावा चोपल्या. मॉर्गननेही त्याला चांगली साथ देत ३६ चेंडूंत एक चौकार व ३ षटकारांसह ४० धावा केल्या. लंकेचा आघाडीचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने २१ धावांत ३ बळी घेत इंग्लंडला दबावात आणले होते.

 —————————————-


धावफलक :
इंग्लंड : जेसन रॉय त्रि. गो. हसरंगा ९, जोस बटलर नाबाद १०१ , डेव्हिड मलान त्रि. गो. चमीरा ६, जॉनी बेयरस्टो पायचीत गो. हसरंगा ०, इयॉन मॉर्गन त्रि. गो. हसरंगा ४०, मोइन अली नाबाद १ अवांतर - ६. एकूण : २० षटकांत ४ बाद १६३ धावा. बाद क्रम : १-१३, २-३४, ३-३५, ४-१४७. गोलंदाजी : दुष्मंता चमीरा ४-०-४३-१; वानिंदू हसरंगा ४-०-२१-३ ; लाहिरु कुमारा ४-०-४४-०; महीश तीक्ष्णा ४-०-१३-०; चमिका करुणारत्ने २-०-१७-०; दासुन शनाका २-०-२४-०.
श्रीलंका : पथुम निसांका धावबाद (मॉर्गन/बटलर) १, कुशल परेरा झे. मॉर्गन गो. राशिद ७, चरिथ असलंका झे. अली गो. राशिद २१, अविष्का फर्नांडो पायचीत गो. जॉर्डन १३, भानुका राजपक्ष झे. रॉय गो. वोक्स २६, दासुन शनाका धावबाद (बटलर) २६, वानिंदू हसरंगा झे. बिलिंग्स गो. लिव्हिंगस्टोन ३४, चमिका करुणारत्ने झे. रॉय गो. अली ०, दुष्मंता चमीरा झे. मलान गो. जॉर्डन ४, महीश तीक्ष्णा झे. जॉर्डन गो. अली २, लाहिरु कुमारा नाबाद १. अवांतर - २. एकूण : १९ षटकांत सर्वबाद १३७ धावा. बाद क्रम : १-१, २-२४, ३-३४, ४-५७, ५-७६, ६-१२९, ७-१३०, ८-१३४, ९-१३४, १०-१३७.
गोलंदाजी : मोइन अली ३-०-१५-२; ख्रिस वोक्स २.३-०-२५-१; आदिल रशिद ४-०-१९-२; ख्रिस जॉर्डन ४-०-२४-२; लियाम लिव्हिंगस्टोन ४-०-३४-१; टायमल मिल्स १.३-०-१९-०.

Web Title: T20 World Cup: England in the semi-finals; Sri Lanka lost by 26 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.