T20 World Cup: लंकेला पराभूत करत उपांत्य फेरी गाठण्याचा इंग्लंडचा प्रयत्न

T20 World Cup: संघांच्या कमकुवत बाजू दूर करत मॉर्गनने इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले आहे. इंग्लंड संघाला अंतिम अकरासाठी अनेक चांगल्या राखीव खेळाडूंचा पर्याय आहे; मात्र आतापर्यंत त्यांना या खेळाडूंना सामन्यात उतरावयाची गरज पडलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 11:28 AM2021-11-01T11:28:28+5:302021-11-01T11:28:49+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup: England's attempt to reach the semi-finals by defeating Sri Lanka | T20 World Cup: लंकेला पराभूत करत उपांत्य फेरी गाठण्याचा इंग्लंडचा प्रयत्न

T20 World Cup: लंकेला पराभूत करत उपांत्य फेरी गाठण्याचा इंग्लंडचा प्रयत्न

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजा : सध्या पूर्ण लयीत असलेला इंग्लंड संघ उपांत्य फेरीची जागा सुनिश्चित करण्यासाठी आज मैदानात उतरेल. तर दुसरीकडे श्रीलंकाही स्पर्धेतील आपले आव्हान टिकविण्याचा कसोशिने प्रयत्न करेल. विश्वचषक विजेतेपदाच्या काही प्रमुख दावेदारांमध्ये इंग्लंडचे नाव घेतले जात होते. पहिले तीन सामने जिंकत इंग्लंडने त्यादृष्टीने वाटचालही सुरू केली आहे. मागच्या सामन्यात मातब्बर ऑस्ट्रेलियाला एकतर्फी धूळ चारल्यामुळे इंग्लंडचा आत्मविश्वास सध्या चांगलाच दुणावलेला आहे.

संघांच्या कमकुवत बाजू दूर करत मॉर्गनने इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले आहे. इंग्लंड संघाला अंतिम अकरासाठी अनेक चांगल्या राखीव खेळाडूंचा पर्याय आहे; मात्र आतापर्यंत त्यांना या खेळाडूंना सामन्यात उतरावयाची गरज पडलेली नाही. इंग्लंड संघासाठी सध्या जमेची बाजू आहे ती म्हणजे सलामीवीर जॉस बटलरचा फॉर्म. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जॉसने केलेली लाजवाब खेळी अनेक संघांना धडकी भरवणारी होती. ऑस्ट्रेलियाच्या एकाही गोलंदाजाला बटलरला रोखता आले नाही. मधली फळी इंग्लंडसाठी थोडा चिंतेचा विषय ठरू शकते. कारण तीन सामन्यात मधल्या फळीला फारशी संधी मिळालेली नाही, तसेच कर्णधार इयोन मॉर्गनचा फॉर्मही इंग्लंडसाठी चिंतेचा विषय आहे; मात्र कर्णधारपदाबाबत मॉर्गनला पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील. कारण ऑस्ट्रेलिया विरोधात मॉर्गनने योग्य डावपेच आखत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणले होते. इंग्लडकडे ख्रिस वोक्स आणि ख्रिस जॉर्डन सध्या चांगली गोलंदाजी करीत आहेत. तर मोईन अली आणि आदिल रशीद ही जोडी युएईतल्या खेळपट्ट्यांवर घातक ठरते आहे.

लियाम लिविंगस्टोनच्या रूपात इंग्लंडकडे गोलंदाजीचा अजून एक पर्याय उपलब्ध झालेला आहे.

असामान्य खेळ करण्याची लंकेला गरज 
मजबूत इंग्लंड संघाला रोखण्यासाठी श्रीलंकेला मैदानावर असामान्य खेळ दाखवण्याची गरज आहे. श्रीलंकेचा संघ तितका अनुभवी नाही; मात्र आतापर्यंत विश्वचषकात त्यांनी चांगला खेळ केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम षटकात झालेला पराभव श्रीलंकेला चांगलाच जिव्हारी लागला असेल. कारण अंतिम षटक सोडले तर संपूर्ण सामन्यात श्रीलंकेने सरस खेळ केला.

तीनपैकी दोन सामने गमावल्यामुळे श्रीलंकेला त्यांचे उर्वरित सामने जिंकणे क्रमप्राप्त झालेले आहे.
चरीथ असंलका आणि सलामीवीर पथून निसांका सध्या उत्तम लयीत आहेत. श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. हसरंगाची फिरकी इंग्लंडसाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे टी-२० विश्वचषकात श्रीलंकेला त्यांचे आव्हान कायम ठेवायचे असेल तर त्यांना बलाढ्य इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावेच लागेल. तर दुसरीकडे इंग्लंडला उपांत्य फेरीची चाहूल लागलेली आहे. त्यामुळे विजयी अभियान कायम ठेवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.

ऑस्ट्रेलिया अजूनही टी-२० मध्ये चांगला संघ आहे - फिंच
‘इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा परिणाम, आम्ही टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांवर होऊ देणार नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ अजूनही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत चांगला संघ आहे,’ असे ऑस्ट्रेलियाचा  कर्णधार ॲरोन फिंच याने सांगितले. टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना गुरुवारी बांगलादेशविरुद्ध, तर शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्ध होईल.
फिंचने म्हटले की, ‘आमच्याकडे पुरेशी विश्रांती घेऊन पुन्हा ताजेतवाने होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यानंतर खूप वेगाने बदल झाले. 
संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. या पराभवाचा परिणाम इतर सामन्यांवर होईल, याची मला अजिबात चिंता नाही. आता         आम्हाला उर्वरित सामने जिंकावेच लागतील. 
संघाच्या धावगतीवर पराभवाचा परिणाम झाल्याने आता आम्हाला आमची सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.’ 
 

Web Title: T20 World Cup: England's attempt to reach the semi-finals by defeating Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.