T20 World Cup 2021, India vs Pakistan: जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या हिंसाचारात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला, तर आपले काही जवान शहीदही झाले. त्यामुळे आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवर टीम इंडियानं बहिष्कार टाकावा अशी मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावर #ban_pak_cricket हा ट्रेंड सुरू आहे. त्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनीही India vs Pakistan सामना रद्द करण्याचा सूर आळवला आहे. पण, कितीही भावनिक झालो तरी टीम इंडियाला तसे करता येणार नाही. २४ ऑक्टोबरला हा सामना होईलच.
भारतीयांनी कितीही भावनिक होऊन सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या, मंत्र्यांनी सामना रद्द करण्याची मागणी केली, तरीही ते शक्य नाही. याचे सर्व अधिकार आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडे अर्थात ICCकडे आहेत. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान शेवटचे भिडले होते. त्यावेळेसही हा सामना रद्द करावा, अशी मागणीनं जोर धरला होता. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्ताननं याची आयसीसीकडे तक्रारही केली होती, परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली मतावर ठाम राहिला. पाकिस्तानविरुद्ध द्विदेशीय मालिका होणार नाही,हे बीसीसीआयनं आधिच स्पष्ट केले आहे.
समजा भारतानं २४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यातून माघार घेतली, तर त्याचा फटका टीम इंडियालाच बसेल. पाकिस्तानला वॉक ओव्हर मिळेलच, शिवाय आयते दोन गुणही मिळतील. अशात आयसीसीही टीम इंडियावर दंडात्मक कारवाई करू शकते. गुण गमावल्यानं टीम इंडियाचा पुढील प्रवास खडतर होऊ शकतो.
आयसीसीलाही भारत-पाकिस्तान सामन्यातून बराच आर्थिक फायदा होणार आहे आणि त्यामुळे तेही हा सामना रद्द करू शकत नाहीत. या एका सामन्यानं स्पर्धेच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो.