T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : इंग्लंडच्या गोलंदाजांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात सुरेख गोलंदाजी केली. विशेषताः फिरकीपटू आदिल रशीदने ( Adil Rashid) पाकिस्तानच्या फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवले. बाबर आजम ( Babar Azam) आणि शान मसूद यांनी पाकिस्तानकडून त्यातल्या त्यात चांगला खेळ केला. सॅक करननेही त्याच्यावरील जबाबदारी चोख पार पाडताना पाकिस्तानला धक्के दिले. १९९२ची पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न घेऊन मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानची डरकाळी फुसकी ठरली. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर त्यांनी शेपुट गुंडाळले.
बेन स्टोक्सने No Ball, Wide Ball ने इनिंग्जची सुरुवात केली. १९९२च्या वर्ल्ड कपमध्येही नो बॉलने पाकिस्तानच्या धावांची बोहनी झाली होती आणि आजही तसेच झाले. रिझवान व बाबर यांनी हळुहळू धावांचा वेग वाढवण्यास सुरुवात केली, पण त्याचवेळी इंग्लंडने हुकूमी एक्का काढला. सॅम करनने त्याच्या पहिल्याच षटकात रिझवानचा ( १५) त्रिफळा उडवून पाकिस्तानला धक्का दिला. रिझवान यापूर्वी दोन वेळा रन आऊट होता होता वाचला. मोहम्मद हॅरीसने काही सुरेख फटके मारून पाकिस्तानी चाहत्यांना खुश केले, परंत आदिर रशीदने त्याच्या पहिल्याच षटकात हॅरीसला गप्प केले. हॅरीसने पुढे येऊन टोलावलेला चेंडू बेन स्टोक्सने सहज टिपला.
बाबर एका बाजून पाकिस्तानची खिंड लढवत होता आणि त्याने शान मसूदसह २४ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केली. रशीदने ही भागीदारी संपुष्टात आणली. रशीदने स्वतःच्याच गोलंदाजीवर रिटर्न झेल टिपला अन् बाबर ३२ धावांवर माघारी परतला. बेन स्टोक्सने इफ्तिखार अहमदची ( ०) विकेट घेत पाकिस्तानला चौथा धक्का दिला. शान मसूद व शादाब खान यांनी पाकिस्तानचा संघर्ष सुरू ठेवला होता. पाकिस्तानने १५ षटकांत ४ बाद १०६ धावा केल्या होत्या आणि मसूद व शादाब फटकेबाजी करत होते. सॅम करनने ही डोईजड झालेली जोडी तोडली. मसूद ३८ धावांवर बाद झाला. सॅम करन हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात इंग्लंडकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने रायन साईडबॉटमचा १० ( २०१०) विकेट्सचा विक्रम मोडला.
१८व्या षटकात ख्रिस जॉर्डनने पाकिस्तानला आणखी एक धक्का देताना शादाबला ( २०) माघारी जाण्यास भाग पाडले. सॅम करनने ४-०-१२-३ अशी दमदार कामगिरी केली. जॉर्डनने अखेरच्या षटकात धक्कातंत्र कायम राखताना पाकिस्तानला ८ बाद १३७ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. जॉर्डनने दोन विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup Final ENG vs PAK : Good bowling from Adil Rashid, Sam Curran and Chris Jorden: England needs 138 runs to win the T20 World Cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.