T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : पाकिस्तानच्या १३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करण्यास भाग पाडले. हॅरीस रौफ, नसीम शाह व शादाब खान यांनी टिच्चून मारा करताना पाकिस्तानला सामन्यात कायम राखले होते. पण, अखेरच्या षटकात शाहिन शाह आफ्रिदीला ( Shahin Afridi) दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि मोईन अली ( Moeen Ali) यांनी हात मोकळे करताना इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले. वेस्ट इंडिजनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप दुसऱ्यांदा उंचावणारा इंग्लंड दुसरा संघ ठरला. यापूर्वी त्यांनी २०१०मध्ये पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.
अॅलेक्स हेल्सला पहिल्याच षटकात शाहिन आफ्रिदीने त्रिफळाचीत केले. फिल सॉल्ट( १०) अपयशी ठरला. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणाऱ्या जोस बटलरची ( २६) विकेट हॅरीस रौफने घेतली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना इंग्लंडच्या धावगतीवर लगाम लावली होती. बेन स्टोक्स व हॅरी ब्रुक ही जोडी त्यांचा सामना करत होती आणि इंग्लंडने पहिल्या १० षटकांत ३ बाद ७७ धावा केल्या. त्यांना विजयासाठी ६० चेंडूंत ६१ धावा करायच्या होत्या. शादाबने इंग्लंडला चौथा धक्का दिला. एकेका धावेसाठी झगडणाऱ्या इंग्लंडच्या ब्रुकने ( २०) मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला अन् शाहिन आफ्रिदीने त्याचा झेल घेतला. पण, यात आफ्रिदीने स्वतःचा गुडघा दुखावून घेतला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. पण, प्राथमिक उपचारानंतर तो मैदानावर परतला.
इंग्लंडला अखेरच्या ५ षटकांत ४१ धावा करायच्या होत्या. आफ्रिदी १६वे षटक फेकायला आला खरा, परंतु त्याला गोलंदाजी करताना वेदना होत असल्याचे जाणवत होते. त्याला १ चेंडू फेकून मैदान सोडावे लागले. इफ्तिखार अहमद ते षटक पूर्ण करण्यासाठी आला अन् स्टोक्सने चौकार-षटकार खेचून त्याच्या ५ चेंडूंत १३ धावा चोपल्या. त्यानंतर मोईन अलीने हात मोकळे केले. १८ चेंडूंत १२ धावा असा सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकला. अखेरच्या १२ चेंडूंत ७ धावा हव्या असताना अली ( १९) बाद झाला. अली व स्टोक्स यांनी ४८ धावांची भागीदारी केली आणि ती निर्णायक ठरली. स्टोक्ने चौकार खेचून ट्वेंटी-२०तील पहिले अर्धशतक पूर्ण केले . स्टोक्स ४८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. वन डे आणि ट्वेंटी-२० असे दोन्ही वर्ल्ड कप जेतेपद एकाच वेळी कायम राखणारा पहिला संघ ठरला.
आदिल रशीद, सॅम करनची भन्नाट गोलंदाजी...
मोहम्मद रिझवान ( १५), मोहम्मद हॅरीस ( ८), इफ्तिखार अहमद (०) हे आज अपयशी ठरले. कर्णधार बाबर आजम ( ३२) आणि शान मसूद ( ३८) हे पाकिस्तानच्या आजच्या डावातील टॉप स्कोअरर ठरले. पाकिस्तानने १५ षटकांत ४ बाद १०६ धावा केल्या होत्या आणि मसूद व शादाब खान फटकेबाजी करत होते. सॅम करनने ही डोईजड झालेली जोडी तोडली. मसूद ३८ धावांवर बाद झाला. सॅम करन हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात इंग्लंडकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. रशीदने ४-१-२२-२ आणि ख्रिस जॉर्डनने ४-०-२७-२ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. पाकिस्तानने ११ षटकांत २ बाद ८४ धावा केल्या होत्या, परंतु पुढील ९ षटकांत त्यांनी ५३ धावांत ६ विकेट्स गमावल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup Final ENG vs PAK Live : ENGLAND ARE THE T20 WORLD CUP CHAMPIONS...!!, Ben stokes match winning half century, beat pakistan by 5 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.