T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : पाकिस्तानच्या १३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करावा लागतोय. त्यांचे ४ फलंदाज ८४ धावांवर माघारी परतले आहेत. पाकिस्तानचे गोलंदाज सामन्यात पुनरागमन करत आहेत, असे वाटत असताना मुख्य गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली होती आणि आता पुन्हा त्याचा गुडघा दुखावला गेला आहे.
मोहम्मद रिझवान ( १५), मोहम्मद हॅरीस ( ८), इफ्तिखार अहमद (०) हे आज अपयशी ठरले. कर्णधार बाबर आजम ( ३२) आणि शान मसूद ( ३८) हे पाकिस्तानच्या आजच्या डावातील टॉप स्कोअरर ठरले. पाकिस्तानने १५ षटकांत ४ बाद १०६ धावा केल्या होत्या आणि मसूद व शादाब खान फटकेबाजी करत होते. सॅम करनने ही डोईजड झालेली जोडी तोडली. मसूद ३८ धावांवर बाद झाला. सॅम करन हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात इंग्लंडकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
त्याने रायन साईडबॉटमचा १० ( २०१०) विकेट्सचा विक्रम मोडला.सॅम करनने ४-०-१२-३ अशी दमदार कामगिरी केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनच्या इतिहासातील ही जलदगती गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. रशीदने ४-१-२२-२ आणि ख्रिस जॉर्डनने ४-०-२७-२ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. पाकिस्तानने ११ षटकांत २ बाद ८४ धावा केल्या होत्या, परंतु पुढील ९ षटकांत त्यांनी ५३ धावांत ६ विकेट्स गमावल्या.
भारतीय गोलंदाजांची उपांत्य फेरीत धुलाई करणाऱ्या अॅलेक्स हेल्सला पहिल्याच षटकात शाहिन आफ्रिदीने त्रिफळाचीत केले आणि निराश बसलेल्या चाहत्यांमध्ये ऊर्जा आली. शाहिनने त्याच्या पुढच्या षटकात संथ गतीने चेंडू टाकून फिल सॉल्टला पायचीत करण्याची अपील केली. मैदानावरील अम्पायरने सॉल्टला नाबाद देताच DRS घेतला गेला, परंतु त्यात तिसऱ्या अम्पायरने मैदानावरील पंचाचा निर्णय कायम राखला. हॅरीस रौफने इंग्लंडला दुसरा धक्का देताना सॉल्टला ( १०) बाद केले. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणाऱ्या जोस बटलरची ( २६) विकेट रौफने घेतली आणि इंग्लंडला मोठा धक्का दिला. इंग्लंडने पॉवर प्लेमध्ये ४५ धावांत ३ फलंदाज गमावले.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना इंग्लंडच्या धावगतीवर लगाम लावली होती. बेन स्टोक्स व हॅरी ब्रुक ही जोडी त्यांचा सामना करत होती आणि इंग्लंडने पहिल्या १० षटकांत ३ बाद ७७ धावा केल्या. त्यांना विजयासाठी ६० चेंडूंत ६१ धावा करायच्या होत्या. शादाबने इंग्लंडला चौथा धक्का दिला. एकेका धावेसाठी झगडणाऱ्या इंग्लंडच्या ब्रुकने ( २०) मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला अन् शाहिन आफ्रिदीने त्याचा झेल घेतला. पण, यात आफ्रिदीने स्वतःचा गुडघा दुखावून घेतला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले.