दुबई - काल झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला. त्याबरोबरच ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा यानेही शुभेच्छा दिल्या. मात्र त्याने ऑस्ट्रेलियन संघाऐवजी न्यूझीलंडला विश्वविजेतेपद पटकावल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अमित मिश्रा ट्विटर आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला.
नेटिझन्सनी सोशल मीडियावर त्याची वेगवेगळे मिम्स बनवून त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. एका युझरने लिहिले की, अमितभाई बरे आहात ना, वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. न्यूझीलंडने नाही. असं तर नाही ना की, तुम्ही सामना पाहिलेला नाही आणि तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली. एकाने लिहिले की, अमित मिश्राने वेगळ्याच काळातील सामना पाहिला असावा.
दरम्यान, चुकीची जाणीव झाल्यानंतर अमित मिश्राने न्यूझीलंडच्या संघाला शुभेच्छा देणारे हे ट्विट डिलीट केले. तसेच ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा देणार नवे ट्विट केले. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावरच्या पुलावरून बरेच पाणी वाहून गेले होते. त्याच्या न्यूझीलंडला शुभेच्छा देणाऱ्या ट्विटवर शेकडो मिम्स तोपर्यंत सोशल मीडियावर फिरू लागले होते.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पूर्ण वर्चस्व राखळे. न्यूझीलंडने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून सहज पाठलाग केला. डेव्हिड वॉर्नर (५३ धावा) आणि मिचेल मार्श (नाबाद ७७) यांच्या धडाकेबाज खेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक ठरल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकावर नाव कोरले आहे. याआधी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र त्यावेळी ऑस्ट्रेलियाला इंग्लंडने पराभूत केले होते.