T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : न्यूझीलंडची झोळी पुन्हा रिकामी राहिली, ऑस्ट्रेलियानं जेतेपदाच्या लढतीत सहज बाजी मारली

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : नशिबानं न्यूझीलंडची थट्टाच चालवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नॉक आऊट सामन्यात पराभवाची मालिका त्यांना आजची रोखता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 10:55 PM2021-11-14T22:55:15+5:302021-11-14T23:03:44+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : HISTORY, Australia won the T20 World Cup 2021, beat New Zealand by 8 wickets  | T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : न्यूझीलंडची झोळी पुन्हा रिकामी राहिली, ऑस्ट्रेलियानं जेतेपदाच्या लढतीत सहज बाजी मारली

T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : न्यूझीलंडची झोळी पुन्हा रिकामी राहिली, ऑस्ट्रेलियानं जेतेपदाच्या लढतीत सहज बाजी मारली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : नशिबानं न्यूझीलंडची थट्टाच चालवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नॉक आऊट सामन्यात पराभवाची मालिका त्यांना आजची रोखता आली नाही. २०१५, २०१९ ( दोन्ही वन डे) व २०२१ ( ट्वेंटी-२०) वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांना जेतेपदानं हुलकावणी दिली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) यानं झुंझार खेळ करून ऑस्ट्रेलियासमोर तगडं आव्हान केलं. पण, या स्पर्धेतील आकडेवारी पाहता प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला क्वचितच विजय मिळवता आले आहे  आणि खेळपट्टीची साथ लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघालाच मिळाली आहे. तेच आताही झालं आणि ऑस्ट्रेलियानं प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला. डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी न्यूझीलंडचे स्वप्न अधुरेच ठेवले. 

कॅप्टन कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे केन विलियम्सननं ( Kane Williams) ... २०१९ चा वन डे वर्ल्ड कप, २०२१ची जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल आणि आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल, संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला तेव्हा कर्णधार केन धावून आला.. डॅरील मिचेल ( ११) लगेच माघारी परतल्यानंतर केन व मार्टीन गुप्तील यांनी संयमी खेळी करून विकेट टिकवून ठेवली. न्यूझीलंडच्या पहिल्या दहा षटकांत १ बाद ५७ धावा झाल्या होत्या. त्यानंतर केननं सूत्र हाती घेताना तुफान फटकेबाजी केली. मिचेल स्टार्क सारख्या प्रभावी गोलंदाजाच्या एका षटकात केननं २२ धावा कुटल्या. जोश हेझलवूडनं १६ धावांत ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला यश मिळवून दिले, परंतु केनचा त्यानं सोडलेला झेलच महागात पडला. 

११-१६ षटकांत न्यूझीलंडनं १ विकेट गमावून ७९ धावा चोपल्या. मार्टीन २८ धावांवर माघारी परतला अन् केनसह त्याची ४५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. या विकेटनंतर केननं धावांची गती वाढवली, त्यानं ग्लेन मॅक्सवेलला दोन खणखणीत षटकात खेचून ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमधील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले, तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक करणारा तो कुमार संगकारा ( २००९ वि. पाकिस्तान) याच्यानंतर दुसरा कर्णधार ठरला. केन व ग्लेन फिलिप्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ६८ धावा जोडल्या आणि त्यापैकी ४६ धावा या केनच्याच होत्या.  केननं ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. हेझलवूनंच त्याची विकेट घेतली. हेझलवूडनं ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  न्यूझीलंडनं २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. 


प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच ( ५) अपयशी ठरला. डॅरील मिचेलनं अप्रतिम झेल टिपला. १५ धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सारवला. उपांत्य फेरीच्या सामन्यात फॉर्मात परतलेल्या वॉर्नरनं किवी गोलंदाजांवर प्रहार केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला पहिल्या १० षटकांत १ बाद ८२ धावा उभारून दिल्या. त्यांना ६० चेंडूंत विजयासाठी ९१ धावा करायच्या होत्या. वॉर्नरला रोखणं अवघड झाले होते आणि त्यानं ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नरच हा सामना संपवेल असे वाटत असताना ट्रेंट बोल्टनं १३व्या षटकात त्याचा त्रिफळा उडवला. वॉर्नर ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. वॉर्नरपाठोपाठ मिचेल मार्शनं अर्धशतक पूर्ण केलं. हा सामना न्यूझीलंडच्या हातून निसटलाच होता आणि आता केवळ निकालाची औपचारिकता पार पाडायची होती.

मार्श व ग्लेन मॅक्सवेल जोडीनं दमदार खेळ केला. ऑस्ट्रेलियाला पाच षटकांत ३७ धावा करायच्या होत्या. मार्शनं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वात जलद अर्धशतकाची नोंद केली. याच सामन्यात केननं ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून कुमार संगकाराचा ( २०१४) ३३ चेंडूंत अर्धशतकाचा विक्रम मोडला होता. मॅक्सवेलनही चांगली फटकेबाजी केली. किवींकडून ट्रेंट बोल्टनं १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. त्याच्या चौथ्या षटकात मार्शचा झेल त्यानंच सोडला. ऑस्ट्रेलियानं ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला. २०१६ मध्ये वेस्ट इंडिजच्या महिला व पुरूष संघांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचवला होता आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पुरुष व महिला संघांनी हा पराक्रम करून दाखवला. मार्श ५० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलनं नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत विजय मिळवला.

Web Title: T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : HISTORY, Australia won the T20 World Cup 2021, beat New Zealand by 8 wickets 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.