T20 World Cup, India vs New Zealand : भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील स्थान जवळपास संपुष्टात आले आहे. पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी एकमेकांविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे होते. त्यामुळे दोन्ही संघांवर समान दडपण होते, पण त्यावर किवी मात करण्यात यशस्वी ठरले. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन बदल करून मैदानावर उतरला. सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशन आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दूल ठाकूर असे हे दोन बदल होते. पण, या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी क्रमवारीत बदल करण्याची रणनिती फसली आणि त्यावरून बरीच टीका झाली. न्यूझीलंडविरुद्ध इशान किशन व लोकेश राहुल या नव्या सलामीवीर जोडीचा प्रयोग झाला अन् तो फसला. रोहित शर्मा त्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि एवढ्या महत्त्वाच्या सामन्यात हा निर्णय कुणी घेतला, हे अखेर समोर आलं.
नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोधैर्य खचले होते. त्यात इशान किशन व लोकेश राहुल हा प्रयोग केला गेला. रोहित तिसऱ्या व कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आला. भारताचे तीनही फलंदाज ४० धावांवर माघारी परतल्यानंतर टीम इंडियावरील दडपण आणखी वाढले अन् संघाला २० षटकांत ७ बाद ११० धावाच करता आल्या. न्यूझीलंडनं हे लक्ष्य ८ विकेट्स राखून पार केले. आता रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय नेमका कुणाचा होता, हे समोर आलं.
भारतीय संघातील सूत्रांनी सांगितले की, रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय हा संघ व्यवस्थापन व सर्वांनी मिळून घेतला होता, परंतु महेंद्रसिंग धोनीनं ही कल्पना समोर ठेवली आणि मुख्य प्रशिक्षक व कर्णधार यांनी त्याला पाठिंबा दिला.''
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, सूर्यकुमार यादव याच्या पाठीत दुखू लागले होते आणि त्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली. इशान किशन यानं सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे संपूर्ण संघ व्यवस्थापनां हा निर्णय घेतला आणि त्यावेळी रोहित शर्माही उपस्थित होता. त्यानंही या चर्चेत सहभाग घेतला होता. मधल्या फळीत डावखुरा फलंदाजानं खेळावं असं आम्हाला वाटत नव्हतं.
रोहितवर विश्वास नव्हता हे दाखवून दिले - सुनील गावसकर ‘न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळविण्यात आले. यातून हाच इशारा मिळत आहे की, ट्रेंट बोल्टचा इनस्विंग माऱ्याचा सामना करण्यास संघ व्यवस्थापनाचा रोहित शर्मावर विश्वास नव्हता,’ असे म्हणत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनावर टीका केली.