T20 World Cup, Hardik Pandya : टीम इंडियाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून हार मानावी लागली. या सामन्यात पराभवाशिवाय टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आणि तो म्हणजे हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) ला झालेली दुखापत. फलंदाजी करताना हार्दिकच्या खांद्यावर चेंडू आदळला आणि त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला नाही. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि आज त्याचा वैद्यकिय अहवाल समोर आला आहे. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयनं ANI ला दिली.
''भारताचा अष्टपैलू खेळाडू पुर्णपणे बरा आहे. त्यामुळे काहीच समस्या नाही. फक्त सावधगिरी म्हणून त्याच्या खांद्याचा स्कॅन करण्यात आला. टीम व्यवस्थापनाला त्याच्याबद्दल कोणतीही रिस्क पत्करायची नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या उजव्या हाताच्या खांद्याला दुखापत झाली होती,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी ANI ला सांगितले. भारताचा दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून विराट ( ५७) व रिषभ पंत ( ३९) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) गोल्डन डकवर माघारी परतला, लोकेश राहुल ( ३) व सूर्यकुमार यादव ( ११) हेही अपयशी ठरले. तरीही भारतानं ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या बाबर आजमनं ( Babar Azam) ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८, तर मोहम्मद रिझवाननं ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.
Web Title: T20 World Cup, Hardik Pandya : Hardik Pandya is fit and raring to go for the second game against New Zealand - BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.