T20 World Cup, IND vs AFG Fixing : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये २००+ धावा करणाऱ्या पहिल्या संघाचा मान पटकावताना टीम इंडियानं अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवला. भारताच्या २ बाद २१० धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावा करता आल्या. रोहित शर्मा, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनी तुफान फटकेबाजी केली. चार वर्षांनंतर संघात परतलेल्या आर अश्विननं चांगली कामगिरी केली आणि मोहम्मद शमीनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. टीम इंडियाचा हा पहिला विजय पाकिस्तानी फॅन्सच्या डोळ्यांत खुपला आणि त्यांनी खोटे पुरावे देत अफगाणिस्तानवर Fixing चा आरोप केला.
रोहित ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकार खेचून ७४ धावांवर माघारी परतला. लोकेश ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा करून माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनीही वाहत्या गंगेत हात धुतले. रिषभ पंतनं १३ चेंडूंत २७ ( १ चौकार व ३ षटकार) धावा केल्या, तर हार्दिक पांड्यानं १३ चेंडूंत ३५ ( ४ चौकार व २ षटकार) धावा करताना टीम इंडियाला २ बाद २१० धावांचा पल्ला गाठून दिला. अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावा करता आल्या आणि भारतानं ६६ धावांनी हा सामना जिंकला. मोहम्मद शमीनं ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
टीम इंडियानं या मोठ्या विजयानं सेमी फायनलच्या आशा कायम राखल्या आहेत आणि त्यावरून पाकिस्तानी चाहते खवळले आहेत. त्यांनी हा सामना फिक्स्ड असल्याचा दावा करताना काही व्हिडीओ पोस्ट करून त्याचा संदर्भ फिक्सिंगशी लावला आहे.
संबंधित बातम्या