T20 World Cup, IND vs AUS : भारतीय संघानं दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. दोन्ही सराव सामने जिंकून आता भारतीय संघ रविवारी पाकिस्तानचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. पण, त्या सामन्यापुर्वी पुन्हा एकदा रोहित शर्मा व विराट कोहली ( Rohit Sharma vs Virat Kohli) यांच्या वादाची चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितकडे टीम इंडियाचे नेतृत्व होतं, परंतु विराटच्या एका कृतीमुळे रोहित जगासमोर खोटारडा ठरला. त्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि काही लोकं विराट-रोहित यांच्यात ठिगणी असे चित्र रंगवू लागले आहेत.
नाणेफेक करण्यासाठी रोहित मैदानावर येताच सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. पण, त्याचवेळी रोहितनं आज विराट विश्रांती करणार असल्याचे सांगितलं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आले. त्यावेळी कर्णधार म्हणून रोहित सर्वात आधी मैदानावर आला, पण त्याच्यामागोमाग विराटही क्षेत्ररक्षणाला आल्यानं सर्वांना धक्का बसला. विराटच्या या कृतीनं रोहित खोटारडा ठरला. त्यात या सामन्यात विराटच नेतृत्व करताना दिसला अन् त्यानं गोलंदाजीही केली.
रोहित व विराट एकामागोमाग मैदानावर येत असताना दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि नेटिझन्सनं थट्टा करत विराट-रोहित यांच्यात वाद असा मॅसेजही त्यावरती पोस्ट केला आहे.