T20 World Cup, India vs Australia Warm-Up match Live : टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दोन्ही सराव सामन्यांत दणदणीत विजय मिळवले. लोकेश राहुल ( KL Rahul) चे सातत्य, रोहित शर्मा ( Rohit Sharma) याची फटकेबाजी, तर गोलंदाजीत अनुभवी भुवनेश्वर कुमार व आर अश्विन यांना गवसलेला सूर हे टीम इंडियासाठी जमेची बाब ठरले. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) गोलंदाजी कधी करेल, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध ( India vs Pakistan) प्लेईंग इलेव्हन निवडताना कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) बरीच माथाफोडी करावी लागेल हे निश्चित आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब म्हणजे वॉर्नरचा फॉर्म. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात त्याला ० व १ धाव करता आली आहे. अॅरोन फिंच ( ८) व मिचेल मार्श ( ०) हे अपयशी ठरले. अश्विननं सलग दोन चेंडूंत वॉर्नर व मार्श यांना बाद केले. फिंचला रवींद्र जडेजानं माघारी पाठवले. पण, आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या मॅक्सवेलनं सराव सामन्यातही झलक दाखवली. त्यानं स्टीव्ह स्मिथसह ऑसींचा डाव सावरला. राहुल चहरनं त्याला ३७ धावांवर माघारी पाठवले.
भुवनेश्वर कुमारनं आजच्या सामन्यात कामगिरीत सुधारणा दाखवली. स्मिथ व मार्कस स्टॉयनिस जोडीनं पाचव्या विकेटसाठी १०च्या सरासरीनं धावा कुटल्या. विराटनं दोन षटकांत १२ धावा दिल्या. आर अश्विननं २ षटकांत ८ धावांत २ विकेट्स, तर जडेजानं ४ षटकांत ३५ धावांत १ विकेट घेतली. स्टॉयनिस २५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४१ धावांवर नाबाद राहिला. स्मिथ ४८ चेंडूंत ७ चौकारांसह ५७ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ५ बाद १५२ धावा केल्या.
भारतीय फलंदाजांचा नाद करायचा नाही, हे ऑस्ट्रेलियालाही कळून चुकलं असावं. लोकेश राहुल सुसाट फॉर्मात आहेच अन् त्याला रोहित शर्माचीही दमदार साथ मिळाली आहे. लोकेश ३१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार मारून ३९ धावांवर माघारी परतला, परंतु त्यानं पहिल्या विकेटसाठी रोहितसह ६८ धावा जोडल्या. अॅश्टन अॅगरनं ही भागीदारी तोडली. विराटच्या अनुपस्थिती सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् त्यानं रोहितला उत्तम साथ दिली. रोहितनं पुल शॉटवर मारलेला षटकार लाजवाब होता. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६० धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. आता हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यांना विजयाची औपचारिकता पूर्ण करायची होती. हार्दिकनं खणखणीत षटकार खेचून टीम इंडियाचा ८ विकेट्स राखून विजय पक्का केला. सूर्यकुमार ३८, तर हार्दिक १४ धावांवर नाबाद राहिला. भारतानं १७.५ षटकांत लक्ष्य पूर्ण केलं.
Web Title: T20 World Cup, IND vs AUS Warm-Up match Live : India chase down 153 runs from just 17.5 overs against Australia with Rohit 60(41), Rahul 39(31), Sky 38*(27) & Hardik 14*(8)
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.