T20 World Cup, India vs Bangladesh : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा विजयपथावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतासमोर आज एडिलेड येथे बांगलादेशचे आव्हान आहे आणि आजचा विजय भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करणारा आहे. ग्रुप २ मध्ये दक्षिण आफ्रिका ५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारत व बांगलादेश यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहे. आज विजय मिळवणारा संघ ६ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचणार आहे. झिम्बाब्वे ( ३), पाकिस्तान ( २) व नेदरलँड्स ( २) हे गुणतालिकेत शर्यतीत आहेत, परंतु त्यांची शक्यता फार कमीच आहे.
- तीन वर्षांनंतर भारत-बांगलादेश यांच्यात प्रथमच ट्वेंटी-२० सामना होतोय आणि त्यामुळे दोन्ही देशांच्या चाहते उत्साहात आहेत.
- एडिलेड ओव्हल येथे भारत २०१६ मध्ये शेवटचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता आणि त्याता ऑस्ट्रेलियाने ३७ धावांनी विजय मिळवला होता.
- बांगलादेशने २०१५च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत एडिलेड येथे इंग्लंडवर १५ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि बांगलादेशच्या चाहत्यांना अशाच करिष्म्याची अपेक्षा आज आहे.
- सूर्यकुमार यादवने ट्वेंटी-२०त २०२२मध्ये ९३५ धावा केल्या आहेत आणि कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाचा मान त्याला मिळू शकतो.
विराट कोहलीला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याची संधी आहे. त्याने १६ धावा केल्यास, तो श्रीलंकेचा माहेला जयवर्धनेला मागे टाकेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकने दुखापतीमुळे मैदान सोडले होते आणि रिषभ पंत यष्टींमागे दिसला होता. आजच्या सामन्यात कार्तिक तंदुरुस्त न झाल्यास रिषभला संधी मिळण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त अक्षर पटेलचे पुनरागमन होऊ शकते. दीपक हुडाला मागच्या सामन्यात खेळवले होते. बांगलादेशने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मालाही प्रथम फलंदाजी करायचीच होती.
भारतीय संघ - लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"