T20 World Cup, India vs Bangladesh : भारताच्या १८४ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने तुफानी खेळी केली. बांगलादेशच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. लिटन दासने २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. नजमूल शांतोसह त्याने पहिल्या ६ षटकांत ६० धावा चढवल्या आणि त्यात त्याच्या एकट्याच्या ५६ धावा होत्या. पण, पावसाची एन्ट्री झाल्याने सर्वांची धाकधुक वाढली आहे. पावसामुळे जर आता सामना रद्द झाल्यास निकाल कोणाच्या बाजूने लागेल ही चिंता सतावतेय.
लोकेश राहुल व विराट कोहली या दोघांनी भारतीय संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आजही अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवने त्याच्या शैलीत फटकेबाजी केली, परंतु आज मोठी खेळी करण्यापासून चूकला. लोकेश ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला. विराटसह त्याने ६७ धावांची भागीदारी केली. सूर्या १६ चेंडूंत ३० धावा ( ४ चौकार) करून माघारी परतला. विराटने अखेपर्यंत फटकेबाजी करताना भारताला मोठा पल्ला गाठून दिला. अश्विन यानेही ६ चेंडूंत १३ धावा कुटल्या. विराट ४४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर नाबाद राहिला. भारताने ६ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला.