T20 World Cup, India vs Bangladesh : पावसाच्या व्यत्ययानंतर सुधारित लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा गड कोसळला. लोकेश राहुलने अचूक थ्रो करताना लिटन दासला रन आऊट केले आणि त्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा ओपनर नजिमूल शांतोला बाद केले. अर्शदीप सिंगने एका षटकात बांगलादेशला दोन धक्के देताना बांगलादेशवरील दडपण वाढवले. त्यात भऱ हार्दिक पांड्यानेही एका षटकात दोन विकेट्स घेतल्या आणि सारे चित्रच बदलले. विराट कोहली व रोहित शर्मा प्रत्येक विकेटनंतर दमदार सेलिब्रेशन करताना दिसले. भारताने रोमहर्षक विजय मिळवून सेमी फायनलचे तिकिट जवळपास निश्चित केले आहे. पण, बांगलादेशच्या या पराभवाने पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
लोकेश राहुलने मॅच फिरवली, डायरेक्ट हिट करून महत्त्वाची विकेट मिळवली, Video
लोकेश राहुल व विराट कोहली या दोघांनी भारतीय संघाला तारले. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आजही अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवने त्याच्या शैलीत फटकेबाजी केली, परंतु आज मोठी खेळी करण्यापासून चूकला. लोकेश ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला. विराटसह त्याने ६७ धावांची भागीदारी केली. सूर्या १६ चेंडूंत ३० धावा ( ४ चौकार) करून माघारी परतला. विराटने अखेपर्यंत फटकेबाजी करताना भारताला मोठा पल्ला गाठून दिला. अश्विन यानेही ६ चेंडूंत १३ धावा कुटल्या. विराट ४४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर नाबाद राहिला. भारताने ६ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला.
भारताच्या १८४ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने तुफानी खेळी केली. लिटन दास व नजमूल शांतो यांनी बांगलादेशला दमदार सुरुवात करून देताना ७.१ षटकांत ६८ धावांची भागीदारी केली. पावसाचा व्यत्यय आला तेव्हा DLS ( डकवर्थ लुईस नियम) नुसार बांगलादेश १७ धावांनी आघाडीवर होता आणि सामना रद्द झाला असता त्यांना विजयी घोषित केले गेले असते. पण, पाऊस थांबला आणि बांगलादेशसमोर १६ षटकांत १५१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले.
सुधारित लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या बांगलादेशला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. लोकेश राहुलच्या डायरेक्ट हिटने भारताला मोठी विकेट मिळवून दिली. २७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा करणारा लिटन दास रन आऊट झाला. त्यानंतर मोहम्मद शमीने टाकलेल्या १०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नजमूल शांतोने खणखणीत फटका मारला, परंतु सूर्यकुमारने सुरेख झेल टिपला. शांते २१ धावांवर बाद झाल्याने बांगलादेशची अवस्था २ बाद ८४ झाली.
रोहितने त्यानंतर अर्शदीप सिंगला गोलंदाजीला आणले आणि त्याने पहिल्याच षटकात विकेट मिळवून दिली. आफिफ होसैन ( ३) याचा झेल सूर्याने टिपला. अर्शदीपने त्याच षटकात महत्त्वाची विकेट घेताना शाकिब अल हसनला ( १३) झेलबाद केले. दीपक हुडाने उत्तुंग उडालेला चेंडू सुरेखरित्या टिपला. दडपणात बांगलादेशकडून चूका होत गेल्या आणि मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात त्यांनी विकेट फेकल्या. हार्दिकने बांगलादेशच्या यासीर अलीला ( १) अर्शदीपकरवी झेलबाद केले. त्याच षटकात हार्दिकने मोसाडेक होसैनचा ( ६) त्रिफळा उडवला. बांगलादेशला १८ चेंडूंत ४३ धावांची गरज होती, परंतु त्यांच्या हातात ४ विकेट्स राहिल्या होत्या.
अर्शदीपने ३ षटकांत २४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. १२ चेंडूंत ३१ धावांची गरज असताना रोहितने हार्दिकला गोलंदाजी दिली आणि पहिल्याच चेंडूवर चौकार गेल्याने भारताच्या चाहत्यांचं टेंशन वाढलं. त्यात तिसरा चेंडू तस्कीन अहमदने खणखणीत षटकार खेचला. २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच असाच थरार पाहायला मिळाला होता आणि तेव्हा महेंद्रसिंग धोनीने चतुराईने रन आऊट करून भारताचा विजय पक्का केला होता. आजही पांड्याने पुढील चेंडू सुरेख टाकले आणि बांगलादेशला ६ चेंडूंत २० धावा करायच्या होत्या.
अर्शदीपच्या पहिल्या चेंडूवर १ धाव दिली आणि नुरूल हसन स्ट्राईकवर आला. पुढच्याच चेंडूवर हसनने षटकार खेचला. त्यानंतर दोन चेंडूंत दोन धावा दिल्या. आता २ चेंडू ११ धावा बांगलादेशला हव्या होत्या आणि अर्शदीपने चौकार दिला. १ चेंडू ७ धावा असा सामना थरारक झाला. अर्शदीपने शेवटच्या चेंडूवर १ धाव दिली आणि भराताने ५ धावांनी ( DLS) सामना जिंकला. बांगलादेशने ६ बाद १४५ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Read in English
Web Title: T20 World Cup, IND vs BAN : India have defeated Bangladesh by 5 runs ( DLS), India moves to the top of the points table in Super 12.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.