T20 World Cup, India vs Bangladesh : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आजच्या सामन्यातही दमदार फलंदाजी करेल अशी असलेली अपेक्षा फोल ठरली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहितला तिसऱ्या षटकात जीवदानही मिळाले होते, परंतु ज्या खेळाडूने त्याचा झेल टाकला, त्यानेच पुढच्या चेंडूवर भारताच्या कर्णधाराला बाहेरचा रस्ता दाखवला. लोकेश राहुल ( KL Rahul) व विराट कोहली ( Virat Kohli) याने दमदार फटकेबाजी करून भारताच्या धावांचा वेग वाढवला. लोकेशही ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा विजयपथावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतासमोर आज एडिलेड येथे बांगलादेशचे आव्हान आहे आणि आजचा विजय भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करणारा आहे. ग्रुप २ मध्ये दक्षिण आफ्रिका ५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारत व बांगलादेश यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहे. आज विजय मिळवणारा संघ ६ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचणार आहे. झिम्बाब्वे ( ३), पाकिस्तान ( २) व नेदरलँड्स ( २) हे गुणतालिकेत शर्यतीत आहेत, परंतु त्यांची शक्यता फार कमीच आहे.
तीन वर्षांनंतर भारत-बांगलादेश यांच्यात प्रथमच ट्वेंटी-२० सामना होतोय आणि त्यामुळे दोन्ही देशांच्या चाहते उत्साहात आहेत. एडिलेड ओव्हल येथे भारत २०१६ मध्ये शेवटचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता आणि त्याता ऑस्ट्रेलियाने ३७ धावांनी विजय मिळवला होता. बांगलादेशने २०१५च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत एडिलेड येथे इंग्लंडवर १५ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि बांगलादेशच्या चाहत्यांना अशाच करिष्म्याची अपेक्षा आज आहे. रोहित व लोकेश यांनी खणखणीत फटके मारून आशादायक चित्र दाखवले, परंतु रोहितने निराश केले.
तस्कीन अहमनदने टाकलेल्या तिसऱ्या षटकात रोहितने उत्तुंग फटका मारला, परंतु हसन महमूदने सोपा झेल टाकला. नेदरलँड्सविरुद्ध रोहितला जीवदान मिळाले होते आणि त्यानंतर त्याने अर्धशतक झळकावले होते. आजही रोहित या संधीचं सोनं करेल असे वाटले, परंतु पुढच्याच षटकात महमूदने भारताच्या कर्णधाराला चूक करण्यास भाग पाडले आणि यासीर अली करवी झेलबाद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup, IND vs BAN : Rohit falls as Hasan Mahmud makes amends for drop, Rohit Sharma dismissed for 2 from 8 balls, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.