T20 World Cup, India vs England Semi Final Live : भारतीय संघाने आज पूर्णपणे निराश केले. इथे सर्व चाहते भारत-पाकिस्तान मेगा फायनलची आस लावून बसले होते अन् रोहित शर्मा अँड कंपनीने मोक्याच्या क्षणी मान टाकली. आतापर्यंत कामगिरीत सातत्य राखणारा भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. विराट कोहलीने अर्धशतक झळकावताना तीन विश्वविक्रम नोंदवले, परंतु त्याची खेळी फारच संथ होती. हार्दिक पांड्याने फटकेबाजी करून भारताची इभ्रत वाचली होती. पण गोलंदाजांनी व क्षेत्ररक्षकांची कामगिरी आज टीका करण्यासाखीच झाली. रोहितनेही सामन्यानंतर पराभवाचं कारण सांगितलं.
जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडच्या सालमीवीरांनी भारताला स्पर्धेबाहेर फेकले आणि १५ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अधुरे राहिले. इंग्लंडने १६ षटकांत बिनबाद १७० धावा करून दणदणित विजय मिळवला. भारतावर १० विकेट्स राखून विजय मिलवताना बटलर व हेल्सने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. बटलरने ४९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८० व हेल्सने ४७ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८६ केल्या.
लोकेश राहुल ( ५) , रोहित शर्मा ( २७) व सूर्यकुमार यादव ( १४) यांनी निराश केल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) इंग्लंडचा सामना केला.रोहित व विराट यांनी ४७ धावांची भागीदारी करून डाव सावरला, परंतु त्यांचा वेग संथ होता. हार्दिकने अखेरच्या षटकात वादळ आणले आणि २९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. २०व्या षटकात रिषभने हार्दिकसाठी स्वतःची विकेट फेकली. स्वतः रन आऊट होत त्याने हार्दिकला स्ट्राईक दिली. हार्दिकने पुढील तीन चेंडूंवर ६,४ असे फटका मारले. अखेरच्या चेंडूवर तो हिट विकेट झाला. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावा करताना संघाला ५ बाद १६८ धावांपर्यंत पोहोचवले.
- रोहित शर्मा म्हणाला, "आज आम्ही खूपच निराशाजनक कामगिरी केली. मला वाटले की आम्ही अखेरच्या षटकांत धावा करून चांगले लक्ष्य उभे केले होते, परंतु गोलंदाजीत अपूरे ठरलो. १६ षटकांत १७० धावा करता येतील, अशी ही खेळपट्टी नव्हती. आमच्या गोलंदाजांना चेंडू वळवता आला नाही.''
- '' बाद फेरीच्या सामन्यात दबाव हाताळणे महत्त्वाचे असते. तुम्ही कोणालाही दबाव हाताळण्यास शिकवू शकत नाही. जेव्हा हे खेळाडू आयपीएलमध्ये प्लेऑफ खेळतात आणि तेथे ते दबाव हाताळण्यास सक्षम आहेत. आम्ही ज्या पद्धतीने चेंडूने सुरुवात केली ती आदर्श नव्हती. आम्ही थोडे घाबरलो होतो, परंतु इंग्लंडच्या सलामीवीरांनाही श्रेय द्यायला हवे. ते खरोखरच चांगले खेळले,'' असेही रोहित म्हणाला.
- त्याने पुढे सांगितले की,''भुवीने पहिले षटक टाकले तेव्हा चेंडू स्विंग झाले. पण आम्ही योग्य ठिकाणी चेंडू टाकू शकलो नाही आणि फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यात अपयशी ठरलो. बांगलादेशविरुद्धचा सामनाही असाच होता, परंतु आम्ही तेथे योग्य गोलंदाजी केली आणि विजय मिळवला होता. ''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"