T20 World Cup, India vs England Semi Final Live : लोकेश राहुलच्या आणखी एका निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहली व रोहित शर्मा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ज्या वोक्सने भारताला धक्का दिला, त्यालाच पुढच्या षटकात खणखणीत षटकार खेचला. विराटची फटकेबाजी पाहून रोहित शर्मानेही आक्रमक फटकेबाजीला सुरुवात केली. पण, रोहित पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
विराट कोहलीचा षटकार पाहून रोहित शर्माही सुसाट सुटला; किंग कोहलीने विश्वविक्रम रचला
लोकेशने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला, परंतु ख्रिस वोक्सने दुसऱ्या षटकात लोकेशला ( ५) बाद केले. उसळी घेणारा बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर लोकेशने फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु यष्टीरक्षकाने सोपा झेल घेतला. सॅम कुरनने टाकलेल्या तिसऱ्या षटकात विराट कोहलीच्या बॅटीला लागून चेंडू पहिल्या स्लीपच्या दिशेने गेला, परंतु मोईन अली झेल घेण्याआधी चेंडू पुढे पडला. वोक्सच्या पुढच्याच षटकात विराटने मारलेला षटकार पाहण्यासारखा होता. विराट व रोहित ही जोडी इंग्लंडचा संयमाने सामना करताना दिसली.
रोहितने पाचव्या षटकात गिअर बदलला आणि कुरनला सलग दोन चौकार खेचले. आदिल रशीदच्या गोलंदाजीवर रोहितचा झेल उडाला होता, परंतु रशीदपासून चेंडू थोडा दूरच पडला. भारताने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ३८ धावा केल्या. दरम्यान, विराटने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ११००+ धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा विक्रम नोंदवला. मार्क वूडच्या जागी आज संधी मिळालेल्या ख्रिस जॉर्डनने रोहितला ( २७) माघारी पाठवले. सॅम कुरनने अफलातून झेल घेतला. भारताने १० षटकांत २ बाद ६२ धावा केल्या. विराटने याही वर्ल्ड कपमध्ये २५०+ धावा केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन पर्वांत २५०+ धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.
रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानावर आला. सूर्याचा फॉर्म बराच बोलका आहे आणि आयसीसी नंबर १ फलंदाजासाठी इंग्लंडने खास तयारी केली होती. सूर्याने बेन स्टोक्सच्या षटकात षटकार व चौकार खेचून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. पण, इंग्लंडने अभ्यास केला होता. आदील रशीदचे एक षटक सूर्यासाठीच राखून ठेवले होते. प्रयत्न करूनही धावा होत नसल्याने सूर्याने आक्रमण करण्याचा निर्णय घेतला अन् इथेच तो फसला. रशीदने संथ पण वळणारा चेंडू टाकला आणि पुढे येऊन सूर्याने मारलेला फटका डीप कव्हरच्या दिशेने गेला. फिल सॉल्टने सहज झेल टिपला. सूर्या १० चेंडूंत १४ धावा करून माघारी परतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"