Join us  

T20 World Cup, IND vs ENG SF Live : विराट कोहलीचे ३ वर्ल्ड रेकॉर्ड, पण भारताची 'कासव' चाल! Kung Fu पांड्याने केली कमाल

T20 World Cup, IND vs ENG SF Live : हार्दिक  पांड्याने ( Hardik Pandya) अखेरच्या षटकांत केलेली फटकेबाजी भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदतशीर ठरली. भारताने सामन्यातील बरीच षटकं 'कासव' गतीने धावा केल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 3:02 PM

Open in App

T20 World Cup, India vs England Semi Final Live : लोकेश राहुल, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी निराश केल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) इंग्लंडचा सामना केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेले दिसले. विराटची खेळी संथ होती, परंतु आज त्याने तीन विश्वविक्रमांची नोंद केली. हार्दिक  पांड्याने ( Hardik Pandya) अखेरच्या षटकांत केलेली फटकेबाजी भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदतशीर ठरली. भारताने सामन्यातील बरीच षटकं 'कासव' गतीने धावा केल्या. 

इंग्लंडने अभ्यास करून Suryakumar Yadavचा 'पेपर' सोडवला; फलंदाजाचा उतावळेपणा महागात पडला, Video 

लोकेश राहुलच्या ( ५) आणखी एका निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहली व रोहित शर्मा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ज्या वोक्सने भारताला धक्का दिला, त्यालाच पुढच्या षटकात खणखणीत षटकार खेचला. विराटची फटकेबाजी पाहून रोहित शर्मानेही आक्रमक फटकेबाजीला सुरुवात केली. पण, रोहित पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.  विराटने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ११००+ धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा विक्रम  नोंदवला. ख्रिस जॉर्डनने रोहितला ( २७) माघारी पाठवले. सॅम कुरनने अफलातून झेल घेतला.  विराटने याही वर्ल्ड कपमध्ये २५०+ धावा केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन पर्वांत २५०+ धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.

रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानावर आला. आयसीसी क्रमावराती नंबर १ फलंदाजासाठी इंग्लंडने खास तयारी केली होती. सूर्याने बेन स्टोक्सच्या षटकात षटकार व चौकार खेचून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. पण, इंग्लंडने अभ्यास केला होता आणि आदील रशीदने ठरवून त्याची विकेट घेतली. सूर्या १० चेंडूंत १४ धावा करून माघारी परतला. विराट खेळपट्टीवर होता, परंतु त्याच्या धावांचा वेग संथ होता. हार्दिक पांड्यालाही मोठे फटके मारण्यापासून इंग्लंडच्या गोलंदाजांनी रोखले होते. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर दडपण वाढताना दिसले. रशीदने ४-०-२०-१ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. भारताने १५ षटकांत १०० धावा फलकावल चढवल्या.

या वर्ल्ड कपमध्ये सॅम कुरनने डेथ ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्याची दोन षटकं राखून ठेवली होती. पण, पांड्याने १७व्या षटकाचा पहिलाच चेंडू सीमापार पाठवला. पांड्याने धावांचा वेग वाढवला होता, पण भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य प्रकर्षाने जाणवत होते. विराटने आणखी एक विक्रम नावावर केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४०००+ धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.  २०१० व २०१४ मध्ये ब्रेंडन मॅक्युलमने ट्वेंटी-२०त अनुक्रमे १००० व २००० धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला होता, त्यानंतर विराट २०२१मध्ये ३००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आणि आज आणखी एक विक्रम नोंदवला.   विराटने ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताचा किल्ला लढवला होता. पण, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. ख्रिस जॉर्डनच्या वाईड यॉर्कवर विराट ५० धावांवर ( ४ चौकार व १ षटकार) रशीदच्या हाती झेलबाद झाला. हार्दिकने अखेरच्या षटकात वादळ आणले आणि २९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. २०व्या षटकात रिषभने हार्दिकसाठी स्वतःची विकेट फेकली. स्वतः रन आऊट होत त्याने हार्दिकला स्ट्राईक दिली. हार्दिकने पुढील तीन चेंडूंवर ६,४ असे फटका मारले. अखेरच्या चेंडूवर तो हिट विकेट झाला. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावा करताना संघाला ५ बाद १६८ धावांपर्यंत पोहोचवले.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंडहार्दिक पांड्याविराट कोहली
Open in App