T20 World Cup, IND vs NZ : भारतीय संघाला रविवारी न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) नेमकं कुठं चुकलं हे सांगितलं आणि त्याच्या त्या वक्तव्यातील एका शब्दावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी नाराजी व्यक्त केली. सलग दुसऱ्या पराभवामुळे भारताचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. यावेळी विराटच्या विधानावर कपिल देव यांनी कर्णधारानं असं विधान करता कामा नये, असे मत व्यक्त केले.
ABP news शी बोलताना ते म्हणाले, विराट कोहली हा लढवय्या आहे. माझ्यामते तो या क्षणाला हरवला आहे किंवा आणखी काहीतरी झालंय. 'आम्ही पुरेसे धाडस दाखवू शकलो नाही', कर्णधारानं असं विधान करायला नको. तू देशासाठी खेळतोस आणि तुझ्यात ती तीव्रता आहे. पण, जेव्हा तू असे विधान करशील, तर तुझ्याकडे बोटं नक्कीच दाखवली जातील.
न्यूझीलंडनं ८ विकेट्स ३३ चेंडू राखून सामना जिंकला आणि टीम इंडियाचा नेट रन रेट आणखी कमी केला. कपिल देव म्हणाले, माझ्याकडे काहीच शब्द नाहीत. आपण अजून किती टीका करणार? आयपीएलमध्ये खेळाडू वर्ल्ड कपची तयारी होईल, असा दावा केला जात होता. पण, जर असे खेळणार असाल, तर टीका होणं सहाजिक आहे. जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतात, परंतु आता कितीही टीका केली तरी ती कमीच आहे. कारण, तुमच्याकडून अपेक्षित कामगिरी झालीच नाही. तुम्ही लढून हरलात तर आम्ही समजू शकतो, परंतु एकाचीही कामगिरी कौतुक करावी अशी झालेली नाही.
विराट कोहली काय म्हणाला?
''फलंदाजी किंवा गोलंदाजी आम्ही काहीच खास करू शकलो नाही. बचाव करता येतील इतक्याही धावा आम्ही करू शकलो नाही, परंतु मैदानावर येतानाच आम्ही लढाऊबाणा हरवलेला होता. भारतीय संघाकडून खेळताना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असता आणि त्या फक्त फॅन्सकडून नाहीत, तर खेळाडूंकडूनही असतात. त्यामुळेच प्रत्येक लढतीत आमच्यावर अधिक दडपण असतेच आणि वर्षानुवर्षे त्यासोबत आम्ही खेळतोय. या दोन सामन्यांत आमची कामगिरी खराब झाली. अजूनही बरंच क्रिकेट खेळणं बाकी आहे,'' असे विराट सामन्यानंतर म्हणाला.
Web Title: T20 World Cup, IND vs NZ : A Captain Should Not Say Words Like ‘We Were Not Brave Enough’-Kapil Dev
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.