T20 World Cup, IND vs NZ : चाहत्यांना वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहली अँड कंपनीकडून पहिल्या विजयाची आस लागली आहे, तर प्रत्यक्ष टीम इंडियाला मात्र हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) चिंता सतावत आहे. आयपीएल २०२१मध्ये एकही चेंडू न फेकणाऱ्या हार्दिकला मेंटॉर महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) सांगण्यावरून संघात कायम ठेवले. आता त्याच्या फिटनेससाठी धोनीसह सारी यंत्रणाच कामाला लागली आहे. त्याचा सकारात्मक निकाल पाहायला मिळतोय. हार्दिकनं शनिवारी नेट्समध्ये गोलंदाजी केली आणि त्याच्यासाठी खास फिटनेस ड्रिल्सही घेण्यात आली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघात कोणता बदल होईल, हे माहित नसले तरी हार्दिक खेळेल हे तरी निश्चित आहे.
न्यूझीलंडविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी करो वा मरो असाच आहे. या सामन्यापूर्वी शनिवारी दोन्ही संघांनी कसून सराव केला. टीम इंडियाचे सर्व खेळाडू कसून सराव करत असताना हार्दिक फिटनेससाठी एकटा सराव करताना दिसला. त्याच्यासोबत महेंद्रसिंग धोनी आणि फिजिओ नितीन पटेल होते. हार्दिकनं नेट्समध्ये पुन्हा गोलंदाजी केली. त्यामुळे उद्याच्या सामन्यात टीम इंडियात बदल होण्याची शक्यता कमीच आहे.
हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त - विराट कोहलीविराट कोहलीनं किवींविरुद्ध हार्दिक खेळणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केलं. तो म्हणाला, हार्दिक पांड्या हा पुर्णपणे बरा आहे. त्याच्या खांद्यावर झालेल्या दुखापतीबाबत तुम्ही विचारत असाल, तो तंदुरुस्त आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले आणि असं होऊ शकतो. नेमकं कुठे चुकलं हे आम्ही जाणून घेतलं आणि त्याचा स्वीकार केलाय, तोही कोणताही अहंकार न ठेवता आणि कारण न देता. त्यामुळे कोणा एकामुळे हरलो असं मी म्हणणार नाही, आम्ही संघ म्हणून हरलो.''
''जसप्रीत बुमराह हा सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळेच त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा असते, संघ म्हणून रणनितीची अंमलबजावणी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. जर आम्ही रणनितीची योग्य अंमलबजावणी केली, तर आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू,''असेही तो म्हणाला.