T20 World Cup, India vs New Zealand Live Upadates : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळेल की नाही, याचा फैसला न्यूझीलंडविरुद्धच्या रविवारी होणाऱ्या सामन्यातून होईल. टीम इंडियाला सलामीच्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे आता त्यांना उर्वरित चारही सामने जिंकावे लागणार आहेत. पहिल्या सामन्यातील चुका सुधारून किवींचा सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. पहिल्या लढतीत दुखापतग्रस्त झालेला हार्दिक पांड्याही ( Hardik Pandya) पूर्णपणे फिट झाला आहे आणि त्यानं नेट्समध्ये गोलंदाजीही केली. पण, तो किवींविरुद्ध खेळेल की नाही आणि कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन याबाबत विराट कोहलीनं ( Virat Kohli) आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
विराट कोहलीनं किवींविरुद्ध हार्दिक खेळणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केलं. तो म्हणाला, हार्दिक पांड्या हा पुर्णपणे बरा आहे. त्याच्या खांद्यावर झालेल्या दुखापतीबाबत तुम्ही विचारत असाल, तो तंदुरुस्त आहे. शार्दूल ठाकूरचा विचार नेहमीच केला जातो. त्याच्याकडे ती क्षमता आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले आणि असं होऊ शकतो. नेमकं कुठे चुकलं हे आम्ही जाणून घेतलं आणि त्याचा स्वीकार केलाय, तोही कोणताही अहंकार न ठेवता आणि कारण न देता. त्यामुळे कोणा एकामुळे हरलो असं मी म्हणणार नाही, आम्ही संघ म्हणून हरलो.''
''या स्पर्धेतील आव्हानं वेगळी आहेत आणि मानसिकदृष्ट्या त्या आव्हानांचा कसा सामना करतो, यावर सर्व काही अवलंबून आहे. नाणेफेक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पण, आता आमचा संपूर्ण फोकस हा मानसिकदृष्ट्या कणखर राहण्यावर आहे,''असेही विराट म्हणाला.
''जसप्रीत बुमराह हा सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळेच त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा असते, संघ म्हणून रणनितीची अंमलबजावणी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. जर आम्ही रणनितीची योग्य अंमलबजावणी केली, तर आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू,''असेही तो म्हणाला.
सहाव्या गोलंदाजाविषयी विराट म्हणाला, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हार्दिककडून तशी अपेक्षा आहे. जेव्हा तो पूर्णपणे बरा होईल, तेव्हा तो नक्की दोन षटकं फेकेल. जर आम्हाला पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाली असती, तर मीही गोलंदाजी केली असती.''
Web Title: T20 World Cup, IND vs NZ : Hardik Pandya is fit for the New Zealand match, Virat Kohli confirms in pre-match press conference
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.