दुबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत लागोपाठ दोन मोठे पराभव स्वीकारावं लागल्यानं भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. आयसीसीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत होण्याची परंपरा टीम इंडियानं कायम ठेवली. पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आता काही चमत्कार घडलाच, तर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठू शकेल.
भारतीय संघाला अवघ्या ११० धावांमध्ये रोखत न्यूझीलंडनं अवघ्या २ फलंदाजांच्या मोबदल्यात आव्हान पार केलं. सामना संपल्यानंतर पत्रकारांनी खेळाडूंशी संवाद साधला. न्यूझीलंडचा लेग स्पिनर ईश सोढी पत्रकार परिषदेत उपस्थित होता. त्यावेळी एका पत्रकारानं त्याला हिंदीत उत्तर देण्यास सांगितलं. त्यावर सोढीनं मजेशीर उत्तर दिलं.
वेगळ्या परिस्थितीत आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्याबद्दल ईश सोढीला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर हिंदीत देऊ शकतोस का, असं पत्रकारानं विचारलं. सोढी मूळचा पंजाबच्या लुधियानाचा आहे. तो ४ वर्षांचा असताना त्याचं कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झालं.
सोढीला हिंदीत उत्तर देण्यास सांगितलं असता, त्यानं दिलेल्या उत्तरानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 'इथे बसलेल्या प्रत्येकाचं माझ्या हिंदीवर लक्ष असेल सर. माझी आईदेखील मला पाहत असेल आणि मी जरादेखील चुकीचं काही बोललो तर ती मला खूप आवडेल. त्यामुळे यावेळी मी इंग्रजीत उत्तर देतो. पण माझं हिंदी सुधारेल अशी आशा व्यक्त करतो,' असं सोढी म्हणाला.
सोढीची शानदार गोलंदाजीईश सोढीनं भारताविरुद्ध प्रभावी गोलंदाजी केली. त्यानं ४ षटकांत १७ धावा देत दोघांना माघारी पाठवलं. त्यासाठी सोढीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सोढीनं विराट कोहली आणि रोहित शर्माला बाद केलं. त्याच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघ अडचणीत आणलं.