T20 World Cup, India vs New Zealand Live Upadates : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी रविवारी न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. न्यूझीलंडसाठीही हा सामना करो वा मरो असाच असल्यानं तेही संपूर्ण ताकदीनं मैदानावर उतरतील, यात शंकाच नाही. या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे. ग्रुप २ मधून पाकिस्ताननं सलग तीन विजय मिळवून उपांत्य फेरीत एक पाऊल टाकलंच आहे आणि आता केवळ औपचारिकता बाकी आहे. पण, या गटातून दुसऱ्या संघासाठीचा निर्णय हा रविवारच्या लढतीतच होईल. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे.
न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट ( Trent Boult) यानं रविवारच्या लढतीपूर्वी टीम इंडियाला इशारा दिला. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी यानं जो करिष्मा केला, त्यासारखीच कामगिरी करण्याची तयारी बोल्टनं दर्शवली आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारतीय संघाला हार पत्करावी लागली होती. ''आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाविरुद्धची लढत ही रोमांचक होते. भारताविरुद्ध खेळताना आम्ही नेहमी सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असतो आणि आयसीसी स्पर्धांमध्ये आम्ही अनेक वर्षांपासून त्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे पुन्हा पराभूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत,''असे बोल्ट म्हणाला.
India vs New Zealand in ICC tournaments
- २००३ वन डे वर्ल्ड कप - न्यूझीलंडचा भारतावर ७ विकेट्स राखून विजय
- २००७ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - न्यूझीलंडचा भारतावर १० धावांनी विजय
- २०१६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - न्यूझीलंडचा भारतावर ४७ धावांनी विजय
- २०१९ वन डे वर्ल्ड कप उपांत्य फेरी - न्यूझीलंडचा भारतावर १८ धावांनी विजय
- २०२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल - न्यूझीलंडनं ८ विकेट्सनी टीम इंडियाला नमवले
न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्तील याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचे टीम इंडियाविरुद्ध खेळणे निश्चित नव्हते. पण, गुप्तील पूर्णपणे तंदुरुस्त असून तो उद्याच्या लढतीत खेळेल, असे बोल्टनं सांगितले.