T20 World Cup, IND vs NZ : भारतात क्रिकेट हा सणच आहे आणि त्यामुळे लोकांच्या या खेळाशी भावना जोडल्या गेल्या आहेत. पण, या भावनांधील खिलाडूवृत्ती हरपत चालली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावल्यानंतर काही उपद्रवी लोकांनी मोहम्मद शमीच्या धर्मावरून टीका केली. त्याला पाकिस्तानी म्हणून हिणवले. त्याच्या बचावासाठी जेव्हा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) मैदानावर आला, तेव्हा त्याच्याही घरच्यांना धमक्या मिळत आहेत. एका सडक्या बुद्धीच्या व्यक्तीनं तर विराट व अनुष्का यांच्या १० महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचाराची धमकी दिली. सोशल मीडियावरून सध्या हे प्रकार सर्रास वाढले आहेत आणि यावेळी विराटच्या कन्येबद्दल असे विकृत विधान करून एका व्यक्तीनं सर्व मर्यादा पार केल्या. विराटच्या कुटुंबीयांवर होत असलेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक ( Inzamam-ul-Haq ) खवळला आणि त्यानं सज्जड दम भरला.
भारतीय संघाला रविवारी न्यूझीलंडकडूनही लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आणि आता त्यांचे उपांत्य फेरीचे आव्हान जवळपास संपुष्टातच आले आहे. फलंदाजीचा क्रम बदलून रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणे, हार्दिक पांड्याला पुन्हा संधी देणे, वरुण चक्रवर्थीलाही पुन्हा खेळवणे, हे विराटचे निर्णय चुकले. पण, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर विशेष करून १० महिन्याच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह विधान करणे कितपत योग्य आहे?; टीम इंडियाच्या पराभवाला कर्णधार म्हणून विराट जबाबदार आहे, पण त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना वादात खेचण्याची गरज काय?. पूर्वी टीम इंडिया पराभूत झाली की विराटची पत्नी अनुष्का शर्माला ट्रोल केले जायचे अन् आता तर मुलीबद्दल अशोभनिय विधान केलं गेलं आहे. फॅन्स म्हणून टीम इंडियाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु त्याचा खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यात डोक्यावण्याचा गैरफायदा उचलणे चुकीचे आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर एका माथेफिरूनं विराटची कन्या हिच्यावर अत्याचार करण्याची धमकी दिली. सोशल मीडियावर सध्या ते ट्विट व्हायरल झाले आहे. या प्रकारानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम यानं अशा वृत्तीच्या लोकांना दम भरला. ''विराट कोहलीच्या मुलीला धमकी दिल्याचे वृत्त माझ्याही कानावर आले आहे. हा एक खेळ आहे, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या संघांसाठी खेळतो, परंतु आहोत एकाच समाजाचा भाग. कोहलीच्या फलंदाजीवर किंवा नेतृत्वावर टीका करण्याचा तुम्हाला हक्क आहे, परंतु त्याच्या कुटुंबीयांकडे कोणीच बोट दाखवू शकत नाही. काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमीबद्दलही हेच घडले. जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. विराटच्या कुटुंबीयांवर टीका झालेली पाहून वेदना झाली,''असे इंझमाम म्हणाला.
भारतासारख्या संघाकडून अशी कामगिरी झालेली पाहून धक्का बसल्याचेही इंझमाम म्हणाला. ''भारत-पाकिस्तान लढतीनंतर हा सामना स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा होता. त्यात भारतीय संघाचा खेळ पाहून मलाच धक्का बसला, ते पूर्णपणे खचलेले होते. टीम इंडियानं एवढं दडपण कसं घेतलं, हेच समजेनासे झालेय. भारतीय संघाला यापूर्वी असं खेळलेलं मी पाहिलेलं नाही. न्यूझीलंडचे दोन्ही फिरकीपटू चांगले होते, परंतु ते जागतिक दर्जाचे फिरकीपटू नव्हते. तरीही भारतीय फलंदाज त्यांच्यासमोर संघर्ष करताना दिसले. विराटलाही स्ट्राईक रोटेट करता येत नव्हती,''असेही तो म्हणाला.
संबंधित बातम्या
हताश होऊ नका, टीम इंडियाला उपांत्य फेरीत जाण्याची अजूनही आहे संधी; जाणून घ्या कशी
टीम इंडियाच्या अपयशावर पाकिस्तानी खेळाडू भलतेच खूश; Live Show मध्ये डान्स करतानाचा Video