मुंबई/दुबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताला धुव्वा उडवला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं आतापर्यंत कधीच भारताचा पराभव केला नव्हता. मात्र काल झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं १० गडी राखून भारतावर मात केली. भारतीय फलंदाज अडखळत असताना पाकिस्तानच्या सलामीच्या दीडशे धावांची अभेद्य भागिदारी रचून संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. हा पराभव भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं एकतर्फी विजय मिळवल्यानं चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं. यानंतर अनेकांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं २०१६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान व्यक्त केलेलं मत आठवलं.
२०१६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यानंतर धोनीनं पत्रकारांशी संवाद साधला. 'आपण त्यांच्यावर विश्वचषकात ११ विजय मिळवले आहेत आणि ते एकदाही आपल्याला नमवू शकलेले नाहीत याचा तुम्हाला अभिमान असेल तर एक सत्य हेदेखील असेल की आम्ही हरू. कधी ना कधी तरी हरू. मग ते आज असेल किवा १० वर्षानंतर, २० वर्षांनंतर किंवा मग ५० वर्षांनंतर. कायम आपणच जिंकत राहू असं होणार नाही,' असं पाच वर्षांपूर्वी धोनी म्हणाला होता.
भारताच्या पराभवावर काय म्हणाला कोहली?सामना आमच्या हातून कसा निसटला आणि काय चुका झाल्या, याची आम्हाला कल्पना आहे, असं कर्णधार विराट कोहलीनं पराभवानंतर म्हटलं. एक संघ म्हणून आम्ही कुठे चुकलो याबद्दल आमच्या मनात स्पष्टता आहे. त्यामुळे आम्ही त्यावर काम करू आणि सुधारणा घडवू. या स्पर्धेत आमचे बरेच सामने बाकी आहेत, असं कोहली म्हणाला.