T20 World Cup, India vs South Africa Live Updates : भारतीय संघाला आज लुंगी एनगिडीने हैराण केले असले तर भारताकडूनही पलटवार झाला. अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) दुसऱ्या षटकात ३ चेंडूंत दोन तगडे फलंदाज माघारी पाठवले. आफ्रिकेला ३ धावांवर दोन धक्के बसले.
एकच वादा, सूर्या दादा! सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, टीम इंडियाची वाचवली इभ्रत
लोकेश राहुल ( ९) , रोहित शर्मा ( १५), विराट कोहली ( १२) , दीपक हुडा ( ०) व हार्दिक पांड्या ( २) हे ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला. लुंगी एनगिडीने ४ महत्त्वाचे फलंदाज बाद करून भारताला मोठे धक्के दिले. पण, सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याही परिस्थितीत दडपणात आला नाही आणि तणाव न घेता त्याने वादळी खेळी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताला सन्मानजक धावसंख्या उभारता आली. एनगिडीने ४-०-२९-४ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. सूर्यकुमारच्या ६८ ( ४०) धावा, अन्य फलंदाजांनी मिळून ५७ (८०) धावा केल्या.
विराटने त्याने १२ धावांची खेळी करून वर्ल्ड कपमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. सूर्यकुमार व दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला आणि सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. सूर्यकुमारने त्याचा फॉर्म कायम राखताना यंदाच्या कॅलेंडर वर्षात १८०च्या स्ट्राईक रेटने ट्वेंटी-२०त ९००+ धावा पूर्ण केल्या. वेन पार्नेलने सूर्या-कार्तिकची ५२ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. कार्तिक ६ धावांवर झेलबाद झाला. सूर्यकुमार ४० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ६८ धावांवर माघारी परतला आणि भारताला ९ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.
त्यानंतर प्रत्युत्तरात उतरलेल्या आफ्रिकेला दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने धक्के दिले. फॉर्मात असलेल्या क्विंटन डी कॉकला ( १) पहिल्याच चेंडूवर स्लीपमध्ये लोकेशकरवी झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रिली रोसोवूसाठी LBW अपील झाले आणि रोहितने अगदी अखेरच्या क्षणाला DRS घेतला. सलग दोन सामन्यांत शतकी खेळी करणारा रोसोवू शून्यावर बाद झाला.