T20 World Cup, India vs South Africa Live Updates : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात निराश केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून हॅटट्रिक साजरी करण्याची संधी रोहित अँड टीमला होती. पण, फलंदाजांनी निराश केल्यानंतर गोलंदाजांना फार काही करण्यासाठी उरलेच नाही. सूर्यकुमार यादवच्या ६८ धावांच्या जोरावर भारताने कशातरी १३३ धावांपर्यंत मजल मारली. पण, विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांनी घात केला. भारताच्या या पराभवामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा जवळपास धुळीस मिळाल्या.
भारताच्या ताफ्यात गोंधळ! Virat Kohli आणि रोहित शर्मा यांच्यामुळे भारतावर आलीय पराभवाची वेळ
लोकेश राहुल ( ९) , रोहित शर्मा ( १५), विराट कोहली ( १२) , दीपक हुडा ( ०) व हार्दिक पांड्या ( २) हे ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला. एनगिडीने ४-०-२९-४ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. सूर्यकुमारच्या ६८ ( ४०) धावा, अन्य फलंदाजांनी मिळून ५७ (८०) धावा केल्या. सूर्यकुमार व दिनेश कार्तिक यांनी ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार ४० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ६८ धावांवर माघारी परतला आणि भारताला ९ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.
प्रत्युत्तरात उतरलेल्या आफ्रिकेला दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने धक्के दिले. फॉर्मात असलेल्या क्विंटन डी कॉकला ( १) पहिल्याच चेंडूवर स्लीपमध्ये लोकेशकरवी झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रिली रोसोवूसाठी LBW अपील झाले आणि रोहितने अगदी अखेरच्या क्षणाला DRS घेतला. सलग दोन सामन्यांत शतकी खेळी करणारा रोसोवू शून्यावर बाद झाला. कॅप्टन टेम्बा बवुमावर आज जबाबदारी होती आणि त्याने काही सुरेख फटकेही मारले. पण, मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्या षटकात ही विकेट मिळवून दिली. दिनेश कार्तिकने अप्रतिम झेल टिपला. आफ्रिकेला १० षटकांत ३ बाद ४० धावा करता आल्या.त्यांना ६० चेंडूंत ९४ धावा विजयासाठी करायच्या होत्या. एडन मार्कराम व डेव्हिड मिलर ही जोडी तोडण्याची आयती संधी चालून आली होती, परंतु रोहितला रन आऊट करता आला नाही. मार्कराम बराच लांब होता आणि रोहितच्या डायरेक्ट हिटने आफ्रिकेला अडचणीत आणले असते. हार्दिक पांड्याने टाकलेल्या ११व्या षटकात मार्करामने १६ धावा जोडल्या. आर अश्विनच्या चेंडूवर मार्कराने मारलेला फटका विराटला सहज टिपता आला असता, पण त्याच्याकडून झेल सुटला. आर अश्विन व रोहित शर्मा यांनी डोक्यावर हात मारला. पुढच्या षटकात रोहितने पुन्हा रन आऊटची सोपी संधी गमावली.
पाकिस्तान बाद...
आफ्रिकेने या विजयासह ५ गुणांची कमाई करून अव्वल स्थानी झेप घेतली. भारत व बांगलादेश प्रत्येकी ४ गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. झिम्बाब्वेच्या खात्यात ३ गुण आहेत. पाकिस्तानचे दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांन आफ्रिका व बांगलादेशचा सामना करायचा आहे. अशात दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानचे ६ गुण होऊ शकतात. तेच आफ्रिकेला दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा सामना करायचा आहे आणि ते हा सामना सहज जिंकून ७ गुणांसह अव्वल स्थान पटकावू शकतात. भारताचे दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांच्यासमोर झिम्बाब्वे व बांगलादेश यांचे आव्हान आहे. यापैकी एक सामना जिंकून भारत उपांत्य फेरीत नेट रन रेटच्या जोरावर पोहोचू शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"