T20 World Cup, India vs Scotland Live Update : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरण्याचा विराट कोहलीचा ( Virat Kohli) निर्णय योग्य ठरला. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja)नं आज ट्वेंटी-२०तील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना स्कॉटलंडचे कंबरडे मोडले. त्याला अन्य गोलंदाजांची चांगली साथ मिळाली. मोहम्मद शमी ( Mohammed Shami) पुन्हा स्टार ठरला आणि त्यानं सलग तीन विकेट्स घेतल्या परंतु यापैकी एक रन आऊट असल्यानं ही टीमची हॅटट्रिक ठरली.
कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) वाढदिवसाला नाणेफेक जिंकली आणि स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतीय संघानं उपांत्य फेरीचं गणित लक्षात ठेऊनच हा निर्णय घेतला. आजच्या संघात टीम इंडिया तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरली आहे. शार्दूल ठाकूरच्या जागी वरुण चक्रवर्थीचे संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्याच षटकात स्कॉटलंडचा सलामीवीर कायले कोएत्झरचा त्रिफळा उडवला. जॉर्ज मुन्सी एका बाजूनं फटकेबाजी करत होता. त्यानं आर अश्विनला रिव्हर्स स्वीप मारत खेचलेले तीन चौकार अप्रतिम होते. विराटनं संघातील यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमी याला पाचारण केलं आणि त्यानं पहिल्याच षटकात यश मिळवून दिलं.
शमीनं ६व्या षटकात मुन्सीला (२४) बाद केलं. त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजानं एकाच षटकात दोन धक्के देत स्कॉटलंडची अवस्था बिकट केली. जडेजानं ७व्या षटकात रिची बेरींग्टन ( ०) व मॅथ्यू क्रॉस ( २) यांची विकेट घेतली. मिचेल लिस्क टीम इंडियाची डोकेदुखी ठरत होता. त्यानं १२ चेंडूंत २ चौकार व १ षटकाराह २१ धावा केल्या. जडेजानं त्याला LBW केले. स्कॉटलंडचा निम्मा संघ ५८ धावांवर माघारी परतला. जडेजानं चार षटकांत १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. ट्वेंटी-२०तील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. आर अश्विननं ख्रिस ग्रिव्हला ( १) बाद करून सहावा धक्का दिला. अश्विनच्या खात्यात आणखी एक विकेट जमा झाली असती, परंतु रिषभ पंतनं स्टम्पिंगची संधी गमावली. अश्विननं २९ धावांत १ विकेट घेतली.
मोहम्मद शमीनं १७व्या षटकात सलग तीन विकेट्स घेतल्या. बुमराहनं एक विकेट घेत स्कॉटलंडचा डाव ८५ धावांवर गुंडाळला. टीम इंडियाला हे लक्ष्य ७.१ षटकांत पार करावे लागेल आणि तरच त्यांचा नेट रन रेट अफगाणिस्तापेक्षा वरचढ बनेल. त्यांनी ११.२ षटकांत हे लक्ष्य पार केले, तर त्यांचा नेट रन रेट +१.०० असा होईल. ८.५ षटकं खेळल्यास त्यांचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा सरस ठरेल.
Web Title: T20 World Cup, IND vs SCO Live Update : Hat Trick by Mohammed Shami, scotland bowled out for just 85; India needs to chase 86 in 7.1 overs to better Afghanistan's NRR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.