T20 World Cup, IND vs SCO : Toh fir bags pack karke ghar jaayenge, Ravindra Jadeja - भारतीय संघानं शुक्रवारी दुबळ्या स्कॉटलंडवर दिवाळी बोनससह विजय मिळवला. स्कॉटलंडला ८५ धावांत गुंडाळून टीम इंडियानं ६.३ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. भारताचा नेट रन रेट आता न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांच्यापेक्षा सरस आहे. भारतानं आता ४ गुण व १.६१९ नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानी झेप घेत, अफगाणिस्तानला ( ४ गुण व १.४८१) चौथ्या क्रमांकावर ढकलले. ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचाही नेट रन रेट ( १.२७७) हा भारतापेक्षा कमीच आहे. पण, अजूनही भारताला उपांत्य फेरीत स्थान पटाकवण्यासाठी अफगाणिस्तानच्या ( Afghanistan) उपकाराची गरज आहे. त्यात स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीनंतर रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) घरी जाण्याची भाषा केल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं स्कॉटलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यानंतर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी तुफान फटकेबाजी करताना भारताला दणदणीत विजय जसप्रीत बुमराहनं ३.४ षटकांत १० धावा देत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा ( ३-१५) नं ट्वेंटी-२०तील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तर मोहम्मद शमीनं ३ षटकांत १ निर्धाव षटक फेकताना १५ धावांत तीन विकेट्स घेतल्या. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्सी ( २४), मिचेल लिस्क ( २१) हे चांगले खेळले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर माघारी परतला.
रोहित-राहुल जोडीनं चार षटकांत धावफलकावर अर्धशतकी धावा फडकवल्या. रोहित १६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३० धावांवर बाद झाला. राहुलनं १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. ट्वेंटी-२०तील हे भारताकडून दुसरे जलद अर्धशतक ठरले. युवराज सिंगनं २००७मध्ये १२ चेंडूंत इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. राहुलनं १९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा केल्या. भारतानं हा सामना ८ विकेट्स व ८१ चेंडू राखून जिंकला. भारतानं ६.३ षटकांत २ बाद ८९ धावा केल्या.
या सामन्यानंतर रवींद्र जडेजा काय म्हणाला?
- प्रश्न - जर रविवारी अफगाणिस्तान न्यूझीलंडला नमवण्यात अपयशी ठरले तर काय करणार?
- उत्तर - मग बॅक पॅक करून घरी जाणार, अजून काय!