दुबई : आयपीएलचा रोमांच संपवून भारतीय क्रिकेटपटू आता टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाले असून सोमवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्याने संघाचे संतुलन साधतील. यावेळी कर्णधार विराट कोहलीचे सर्वाधिक लक्ष हार्दिक पांड्यावर असेल. आयपीएलमध्ये अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतर सराव सामन्यात तो कसा खेळतो, यावर त्याचे अंतिम संघातील स्थान अवलंबून असेल.
‘आयपीएल’द्वारे भारताचे सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने कर्णधार कोहलीपुढे फार अडचणी नसतील. मात्र, त्याचवेळी, हार्दिकवर त्याची विशेष नजर असेल. आयपीएलमध्ये हार्दिकने एकही षटक गोलंदाजी केली नाही. अशा परिस्थितीत केवळ फलंदाज म्हणून तो संघाची कशी मदत करेल, हे कोहलीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचवेळी ‘सलामीवीर’ म्हणून रोहित शर्मा निश्चित असला, तरी त्याचा साथीदार म्हणून इशान किशन आणि लोकेश राहुल यांच्यात स्पर्धा रंगेल. त्यामुळे सराव सामन्याद्वारे चमकदार कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी दोन्ही खेळाडूंकडे आहे. रोहितसोबत दुसरा सलामीवीर कोण असेल, याचा निर्णय या सामन्यांमधील कामगिरीवरून संघ व्यवस्थापनाला घेता येणार आहे.
२४ ऑक्टोबरला होणारा पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या सराव सामन्याद्वारे संघाचे योग्य संतुलन साधणे कोहलीचे मुख्य लक्ष्य असेल तसेच, अंतिम संघात ज्यांचे स्थान निश्चित नसेल, अशा खेळाडूंचा फॉर्म पाहण्याची संधीही सराव सामन्यांद्वारे मिळेल.
फिरकीपटूंमध्ये रवींद्र जडेजाचे स्थान निश्चित असून तंदुरुस्त राहिल्यास वरूण चक्रवर्तीलाही स्थान मिळेल. तिसरा फिरकीपटू म्हणून राहुल चहर आणि रवीचंद्रन अश्विन यांच्यात स्पर्धा असेल. वेगवान गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर मदार असून दोन फिरकी गोलंदाजांना खेळविण्याचा निर्णय झाल्यास वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर अंतिम संघात खेळू शकतो.
इंग्लंडला जोस बटलर, जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या आक्रमक फलंदाजांकडून मोठी अपेक्षा असेल. लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान हे सध्या फॉर्मशी झगडत असून कर्णधार इयॉन मॉर्गनही आयपीएलमध्ये अपयशी ठरला होता. त्यामुळे सराव सामन्यातून फॉर्ममध्ये मिळविण्याचा या खेळाडूंचा प्रयत्न असेल.
Web Title: t20 world cup india vs england kohli brigade to take on england in warm up game
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.