T20 World Cup, India vs Namibia Live Update : भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीपूर्वीच संपुष्टात आले. विराट कोहलीला कर्णधार म्हणून शेवटच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद जिंकून देण्याचे सहकाऱ्यांचे स्वप्नही धुळीस मिळाले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराटचा हा ५०वा सामना आहे. विराटनं नाणेफेकीनंतर त्याच्या कर्णधार म्हणून प्रवासावर भाष्य केलं.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलेली. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम विराटनं केला. आयसीसीच्या सर्व स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणारा ( चॅम्पियन्स ट्रॉफी, वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) विराट हा पहिलाच कर्णधार ठरला आहे. २०१७मध्ये सर्व प्रकारच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियानं सलग १२ सामने जिंकण्याचा पराक्रम केला तो विराटच्या नेतृत्वाखाली. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा भारत हा पहिलाच आशियाई देश ठरला. भारतानं ७० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत नमवले. २०१०-२० या कालावधीत ट्वेंटी-२०त सलग १० मॅच जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियानं केला.
विराट कोहली काय म्हणाला?कर्णधारपद मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. मला ही संधी मिळाली आणि मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. आता या जबाबदारीतून मुक्त होण्याचा आणि पुढे जाण्याची वेळ आली आहे. मला या संघाचा अभिमान वाटतो. आता मला वाटते की या संघाला पुढे नेण्याची वेळ आली आहे. रोहित शर्मा इथे आहेच आणि तो कर्णधारपदाची सूत्रे हातामध्ये घेईल."