दुबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारताचा मुकाबला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्कराव्या लागलेल्या टीम इंडियासाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारताच्या अडचणी वाढू शकतात. या सामन्याआधी भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या फिट असून त्यानं गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. हार्दिकनं बुधवारी दुबईत स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच सोहम देसाई आणि फिजिओ नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली सराव सुरू केला. हार्दिकनं नेट्समध्ये भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूरसोबत २० मिनिटं गोलंदाजी केली.
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी हार्दिकच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक गोलंदाजी करताना दिसू शकेल. हार्दिक गोलंदाजी करत नसल्यानं भारताला एका गोलंदाजाची कमतरता जाणवत आहे. श्रीलंका दौऱ्यावर असताना हार्दिकच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे त्या दौऱ्यात हार्दिकनं १६ षटकंच टाकली. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही हार्दिकनं मुंबई इंडियन्सकडून एकही षटक टाकलं नाही.