Virat Kohli breaks silence on Mohammed Shami's trolling - टीम इंडियाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात सर्व आघाड्यांवर पाकिस्तानचा संघ विराट कोहली अँड कंपनीवर ( Virat Kohli) भारी पडला. पण, सोशल मीडियावर नेटिझन्सनी पराभवाचं सर्व खापर मात्र गोलंदाज मोहम्मद शमीवर ( Mohammed Shami) फोडलं. शमीनं त्या सामन्यात ३.५ षटकांत ४३ धावा दिल्या होत्या आणि ट्रोलर्सनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन शमीवर टीका केली. भारतीय गोलंदाजाच्या सोशल अकाऊंटवर ट्रोलर्सनी धमकीचे आणि हिन दर्जाचे मॅसेजही पाठवले. शमीच्या समर्थनात टीम इंडियाच्या माजी खेळाडूंसह पाकिस्तानचे खेळाडूही मैदानावर उतरले. पण, टीम इंडियाच्या सध्याच्या संघातून एकानंही प्रतिक्रिया दिली नाही. BCCIनं तशा सूचनाच सर्वांना दिल्या होत्या, पण, आज विराट कोहली ( Virat Kohli) व्यक्त झाला अन् कठोर शब्दात टीकाकारांवर बरसला.
मोहम्मद शमीवरील झालेल्या टीकेवर विराट म्हणाला,''आम्ही मैदानावर खेळणारे खेळाडू आहोत, सोशल मीडियावर पाठीचा कणा नसलेली माणसं आम्ही नाही. सोशल मीडिया हा काही लोकांसाठी मनोरंजनाचं साधन बनलं आहे आणि हे खूप वाईट आहे. जी लोकं फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत, त्यांच्याकडून असे कृत्य केले गेले. एखाद्याच्या धर्मावरून टीका करणे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. मी कधीच धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही. अशा लोकांची मानसिकता सडकी असते. या लोकांना शमीची खेळाप्रती असलेली निष्ठा दिसत नसेल, तर त्यांना समजावण्यात मला माझा वेळ वाया घालवायचा नाही.''
''आम्ही २०० टक्के शमीच्या पाठीशी आहोत. तो आमचा भाऊ, मित्र आहे आणि या अशा प्रकारामुळे संघ खचणार नाही. लोकांनी कितीही टीका करू दे, त्याचा संघावर परिणाम होणार नाही. कर्णधार म्हणून मी हे सांगतो की शमीचं देशाप्रती असलेलं प्रेम अविश्वसनीय आहे,''असेही विराट म्हणाला.