T20 World Cup, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत आणि प्रत्येकी दोन सराव सामनेही खेळणार आहेत. मागील काही वर्षांत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यानं मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवलं आहे आणि त्याची फलंदाजी पाहण्यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) व गोलंदाज मैदानावर पोहोचले. सोमवारी पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज असा सराव सामना झाला अन् त्यात प्रेक्षक म्हणून चक्क टीम इंडियाचे खेळाडू उपस्थित होते. पाकिस्तानी कर्णधाराच्या फलंदाजीचे बारकावे जाणून घेण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी सामन्याला विशेष हजेरी लावली. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंच्या कामगिरीवर टीम इंडियाच्या प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि खेळाडू यांनी बारीक लक्ष ठेऊन काही नोट्स तयार केल्या. ''आयसीसी अकादमीच्या मैदानावर पाकिस्तानचा संघही खेळतोय याची कल्पना आम्हाला नव्हती. सीमारेषेबाहेरून त्यांचा खेळ पाहताना आनंद झाला.''असे भारतीय संघातील एका अधिकाऱ्यानं सांगितले.
याच मैदानावर भारत-इंग्लंड असा सराव सामना रंगला होता. ज्यावेळी टीम इंडिया येथे दाखल झाली, तेव्हा पाकिस्तानची फलंदाजी सुरू होती. पाकिस्ताननं पहिल्याच सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं ठेवलेलं १३१ धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं १५.३ षटकांत पूर्ण केलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) ४१ चेंडूंत ५० धाला तर फाखर झमानने २४ चेंडूंत ४६ धावा कुटल्या. विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजला धक्के दिले. विंडीजला २० षटकांत ७ बाद १३० धावा करता आल्या. किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकात सलग पाच चौकार खेचून विंडीजची धावसंख्या वाढवली. शिमरोन हेटमायरने २८ धावा केल्या, तर पोलार्डनं १० चेंडूंत २३ धावा कुटल्या.