T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तान संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला पहिल्यांदा काय पराभूत केले, त्यांच्या पाठिराख्यांना पंखच फुटले. वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ इतक्या वाईट पद्धतीनं पराभूत होईल, असे खरंच कुणाला वाटले नव्हते. शाहिन शाह आफ्रिदीच्या भेदक माऱ्यानंतर बाबर आजम व मोहम्मद रिझवान या दोघांनीच नाबाद खेळी करताना पाकिस्तानला १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचा हा टीम इंडियावरील पहिलाच विजय ठरला. तरीही या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं रिझवानला मिठी मारून अभिनंदन केलं. सामन्यानंतर मेंटॉर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत गप्पा मारल्या. एकीकडे भारतीय खेळाडू खिलाडूवृत्ती दाखवत असताना पाकिस्तानचे माजी खेळाडू सुसाट सुटले आहेत.
भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan) यांच्यासह शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी पासून ते आजी-माजी सर्व खेळाडूंनी बाबर आजम अँड टीमचे कौतुक केलं. पाकिस्तानी चाहत्यांना बऱ्याच वर्षांनंतर अखेर फटाके फोडण्याची संधी मिळाली. पाकिस्तानी मंत्री बेताल वक्तव्य करू लागली, त्यांच्यापर्यंत ठीक होतं, पण पाकिस्तानी माजी खेळाडू टीव्ही चॅनेलवर बरळताना दिसत आहेत. असंच बेताल वक्तव्य पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूस यानं केलं आहे. वकारनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदावरून राजीनामा दिला होता आणि आज तोच वकार काहीही बरळतोय.
एका पाकिस्तानी चॅनेलच्या कार्यक्रमात वकार म्हणाला,''मोहम्मद रिझवानच्या फलंदाजीपेक्षा त्यांनी एवढ्या हिंदूंसमोर नमाज पठण केलं. तो क्षण मला सर्वात सुखावणारा होता.'' वकारचं हे विधान कदाचित चॅनेलच्या अँकरलाही आवडलं नाही आणि त्यानी विषय बदलण्याचा प्रयत्न केला.
पाहा व्हिडीओ...
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून विराट ( ५७) व रिषभ पंत ( ३९) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) गोल्डन डकवर माघारी परतला, लोकेश राहुल ( ३) व सूर्यकुमार यादव ( ११) हेही अपयशी ठरले. तरीही भारतानं ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या बाबर आजमनं ( Babar Azam) ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८, तर मोहम्मद रिझवाननं ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.