T20 World Cup, India vs Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या लढतीपूर्वी मैदानाबाहेर वातावरण तापू लागलं आहे. भारताकडून या सामन्याबद्दल काहीच दावे केले जात नसले तरी पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू आतापासूनच शाब्दिक फटाके फोडत आहेत. २००९मधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत नव्हते आणि त्यामुळे त्यांना दुबईत खेळावे लागले. त्याचाच आधार देत UAE हे आमचं घरचं मैदान आहे आणि त्यामुळे आमचे पारडे जड आहे, असा दावा कर्णधार बाबर आजमनं ( Babar Azam) आधीच केला होता. त्यात आता माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार अन् टीम इंडियाचा चुराडा करणार, असा दावा केला आहे.
आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ ७ वेळा भिडले, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाच वेळा भिडले आणि भारतानेच बाजी मारली. चॅम्पियन्स ट्रॉफीत मात्र ५ पैकी २ सामने भारतानं जिकंल, तर तीनमध्ये पाकिस्ताननं बाजी मारली आहे. आयसीसी स्पर्धांमधील दोन्ही संघांतील जय-पराजयाची आकडेवारी पाहता भारताचे पारडे १४-०३ असे जड आहे. तरीही शोएब अख्तर म्हणाला, पाकिस्तान संघानं १८० किंवा १७० धावा जरी केल्या, तरी टीम इंडिया मोठ्या संकटात सापडेल. कारण हे आयपीएल नाही, तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आहे. ( If Pakistan scored 180 or even 170 then India will be in deep trouble, because this is not IPL this is World Cup)
तो पुढे म्हणाला, ''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांना ५०-५० टक्के संधी आहे. सारेच पाकिस्तानला कमी लेखत आहेत, परंतु पाकिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकू शकतो. पाकिस्तान धक्कादायक निकाल नोंदवेल आणि मोठा दणका देईल. त्यामुळे टीम इंडियावर दडपण असेल आणि त्यांचा चुराडा होईल.''