T20 World Cup, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान मुकाबला दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही. यावेळी भारतीय खेळाडूंच्या ढिसाळ कामगिरीमुळे पाकिस्तानी चाहत्यांना विजयाचे फटके फोडण्याचा 'मौका' दिला. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाची मालिका खंडित करून टीम इंडियाला प्रथमच नमवण्याचा पराक्रम केला. पाकिस्ताननं हा सामना १० विकेट्स राखून जिंकताना टीम इंडियाला सर्व आघाड्यांवर शरणागती पत्करण्यास भाग पाडले. हा पराभव पचवून टीम इंडियानं Super 12 मध्ये तीन विजय मिळवत वर्ल्ड कप स्पर्धेचा निरोप घेतला. २०१२नंतर प्रथमच टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीत बाद झाली. भारताच्या या कामगिरीनंतर पुन्हा एका India vs Pakistan सामन्याची चर्चा सुरू झाली आहे. जाणून घेऊया नेमकं काय घडलं...
भारत-पाकिस्तान लढतीत काय झालेलं?प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ ७ बाद १५१ धावा करू शकला. रोहित शर्मा, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव हे आघाडीचे तीन फलंदाज ३१ धावांवर माघारी परतले होते. विराट कोहली ( ५७) व रिषभ पंत ( ३९) यांनी संघर्ष केला. शाहिन आफ्रिदीनं ३ विकेट्स घेत टीम इंडियाला मोठे धक्के दिले. प्रत्युत्तरात बाबर आजम ( ६८*) व मोहम्मद रिझवान ( ७९*) यांनी पाकिस्तानला सहज विजय मिळवून दिला.
- भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्व रेकॉर्ड मोडले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार ही मॅच १६७ मिलियन म्हणजेच १६.७ कोटी लोकांनी पाहिली. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वाधिक प्रेक्षकसंख्या राहिलेली मॅच ठरली. यापूर्वी २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला उपांत्य फेरीचा सामन्याला सर्वाधिक व्ह्यूअर्स मिळाले होते.
- ''भारत-पाकिस्तान सामन्यानं सर्व विक्रम मोडले. १६७ मिलियन व्ह्यूअर्स मिळाले. आतापर्यंतची ही ट्वेंटी-२० सामन्याला मिळालेली सर्वाधिक व्ह्यूअर्स संख्या आहे,''असे स्टार स्पोर्ट्सच्या प्रवक्त्यानं सांगितले.