नवी दिल्ली - भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना एकतर्फीच झाला, त्यामध्ये पाकिस्तानने भारतावर 10 गडी राखून सहजच विजय मिळवला. भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan) यांच्यासह शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी पासून ते आजी-माजी सर्व खेळाडूंनी बाबर आजम अँड टीमचे कौतुक केलं. पण, पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूस यानं टीव्ही चॅनेलवर धार्मिक अन् बेताल वक्तव्य केलं. त्यावरुन, जगभरातून वकारला ट्रोल करण्यात आलंय. आता, पाकिस्तानच्याच खेळाडूने वकार युनूसला टोला लगावलाय.
एका पाकिस्तानी चॅनेलच्या कार्यक्रमात वकार म्हणाला, ''मोहम्मद रिझवानच्या फलंदाजीपेक्षा त्यांनी एवढ्या हिंदूंसमोर नमाज पठण केलं. तो क्षण मला सर्वात सुखावणारा होता,''. वकारच्या या विधानाचा जगभरातून समाचार घेतला जात आहे. भारतीय खेळाडूंनीही वकारला चांगलंच सुनावलं आहे. मात्र, आता वकारला घरचा अहेर मिळाला असून पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि उत्कृष्ट गोलंदाज दानिशे कनेरियाने कू अॅपवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. युनूसने पाकिस्तानी चॅनेलवरुन बोलताना, हिंदूबाबत अपमानकारक भाषा वापरली. मी एक स्वाभीमानी हिंदू आहे, वकारच्या त्या विधानाने मी निराश आहे, खेळात धर्माला आणू नका, असे मत दानिशने व्यक्त केलंय. दरम्यान, पाकिस्तानने भारताकडून विश्वचषक स्पर्धेत सलग 12 सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर 13 वा सामना सहजच जिंकला. त्यानंतर, पाकिस्तानी खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. त्यात, वकारचे हे विधान टीकेचे धनी ठरले.
हर्षा भोगलेनंही चांगलंच सुनावलं
वकारच्या वक्तव्याचा समालोचक हर्षा भोगले यानं टविटरवरुन समाचार घेतला. त्यानं ट्विट केलं की, ''वकार युनिसच्या वक्तव्यानं निराश झालो. या विधानामागची काळी बाजू पाकिस्तानातील क्रीडा प्रेमिंना समजली असेल, अशी मी आशा करतो. तेही माझ्या बाजूने होतील. ''असा क्रिकेटपटू या खेळाचा सदिच्छादूत होऊ शकतो का, त्यानं जबाबदारीनं विधान करायला हवं होतं. मला खात्री आहे की वकारकडून या विधानावर माफी मागितली जाईल. क्रिकेटनं जगाला एकत्र आणायचंय, त्याला धर्माचा रंग देऊन तोडायचं नाही,''असेही भोगलेंनी ट्विट केलं.
व्यंकटेश प्रसादनही फटकारलं
''जिहादी मानसिकता असलेल्या सडक्या डोक्यातून हा खेळ दुषित केला जातोय. काय निलाजरा माणूस आहे,''असे भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद यानं ट्विट केलं.