T20 World Cup, Ireland vs Sri Lanka Live : आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर १२ गटात विजयाने सुरुवात केली. आज झालेल्या सामन्यात श्रीलंकेने ९ विकेट्स राखून आयर्लंडला मात दिली.
आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू जॉर्ज डॉक्रेल ( Ireland all-rounder George Dockrell) याचा कोरोना रिपोर्ट संभाव्य सकारात्मक आला असल्याचे क्रिकेट आयर्लंडने मान्य केले. पण, आयसीसीच्या सध्याच्या नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूला खेळण्यापासून रोखू जाऊ शकत नाही, परंतु त्याला संघाच्या अन्य खेळाडूंपासून दुरावा बनवून ठेवावा लागेल. डॉक्रेल याच्या अहवालात सौम्य लक्षण असल्याचे दिसतेय आणि त्यामुळे त्याला आयर्लंडने मैदानावर उतरवले. त्याने आज १६ चेंडूंत १४ धावांचे योगदान दिले. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडला ८ बाद १२८ धावा करता आल्या. हॅरी टेक्टरने सर्वाधिक ४५ आणि पॉल स्टर्लिंगने ३४ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. वनिंदू हसरंगा ( २-२५) व महिषा थिक्साना ( २-१९) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. बिनुरा फर्नांडो, लाहिरु कुमारा, चमिका करुणारत्ने व धनंजया डि सिल्वा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या कुसल मेंडिस व धनंजया डी सिल्वा यांनी पॉवर प्लेमध्ये ५० धावा फलकावर चढवत आक्रमक सुरुवात केली. मेंडिस-सिल्वाची ६३ धावांची भागीदारी गॅरेथ डिलॅनीने संपुष्टात आणली. धनंजया डी सिल्वा २५ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह ३१ धावांवर बाद झाला. श्रीलंकेने हा सामना १५ षटकांत १ बाद १३३ धावा करून जिंकला. मेंडिस ४३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला, तर चरिथ असलंकानेही नाबाद ३१ धावा केल्या.