T20 विश्वचषकात सहभागी होण्यापूर्वी भारतीय संघ मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तिसऱ्या टी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी तरीही भारतानं २-१ अशी मालिका खिशात घातली. आशिया चषकातील पराभवानंतर टीम इंडियाने ज्या प्रकारे पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलिया व त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन टी-20 मालिका जिंकली, त्यामुळे संघाचे मनोबल मोठ्या प्रमाणात उंचावले आहे. मात्र, यादरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर संघाच्या गोलंदाजीलाही मोठा झटका बसला आहे.
जसप्रीत बुमराह हा विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग होता. परंतु दुखापतीमुळे तो बाहेर पडल्यानंतर आता त्याच्याऐवजी कोणाला संघात संधी द्यायची हे बीसीसीआय आणि व्यवस्थापनासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि बाऊंसी त्रॅकवर बुमराहची कमतरता कोणता गोलंदाज भरून काढू शकतो हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे.
ऑस्ट्रेलियातपोहोचून निर्णय१५ पैकी ७-८ खेळाडू याआधी ऑस्ट्रेलियात गेले आहेत. आम्ही तेथे काही सराव सामने खेळू. बुमराह संघात नसणं हा मोठा फटका आहे, पण आमच्याकडे काही खेळाडू आहेत जे त्याची जागा घेऊ शकतात. ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असं रोहित शर्मानं यावेळी स्पष्ट केलं. अनेक खेळाडू ऑस्ट्रेलियात सामने खेळले नाहीत. यासाठी आम्ही पहिले तिकडे जात आहोत. आम्ही पर्थच्या बाऊंसी पिचवर खेळू आणि नंतर काय करता येईल हे पाहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“आम्हाला आमच्या गोलंदाजीवर लक्ष द्यावं लागेल. पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये आम्हाला काय पर्याय मिळतात हे पाहू. आम्ही जागतिक स्तरावरील संघांसोबत खेळणार आहोत. आम्ही कसं उत्तम करू शकतो यावर विचार करायला हवा. हे आव्हानात्मक असेल आणि या दिशेनं याचं उत्तर शोधण्याची गरज आहे,” असं रोहित म्हणाला.
काय म्हटलंय द्रविडनं?आमच्याकडे १५ ऑक्टोबरपर्यंतची वेळ आहे. शमी पहिल्यापासूनच स्टँडबायचा भाग आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे नुकत्याच झालेल्या सीरिजमध्ये त्याला खेळता आलं नाही. परंतु आता १४-१५ दिवसांनंर त्याची रिकव्हरी कशी आहे हे पाहावं लागेल. त्याचा रिपोर्ट मिळाल्यावर आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत, असं द्रविडनं सांगितलं.