दुबई - टी-२० विश्वचषकाची सुरुवात झाल्यापासूनच रोमांचही वाढू लागला आहे. धमाकेदार फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणामध्येही खेळाडू सातत्याने आपली चमक दाखवत आहेत. सोमवारी श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात झालेल्या लढतीत श्रीलंकेने ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. मात्र या सामन्यातील श्रीलंकेच्या विजयापेक्षा कर्णधार दासुन शणाका याने टिपलेल्या एका झेलची चर्चा होत आहे. हा एक असा झेल होता जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत होऊ शकतात.
सुमारे ३३ सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल. डावातील १९व्या षटकात चमिरा गोलंदाजी करत होता. तर नामिबियाचा ट्रंपलमेन फलंदाजी करत होता. चमिराच्या गोलंदाजीवर ट्रंपलमॅन चकला आणि त्याच्या बॅटची कड घेऊन चेंडू मिडऑफच्या दिशेने उडाला. त्यानंतर दासून शणाका हवेत झेप घेतली आणि त्यानंतर एका हाताने झेल पकडला. झेल घेतल्यानंतर तो मैदानावर घसरला. मात्र त्याने चेंडूवरील पकड सोडली नाही. त्यामुळे ट्रंपलमॅनला माघारी परतावे लागले.
हा झेल पाहून कुणाचाही क्षणभर विश्वास बसला नाही. एवढेच नाही तर नामिबियाच्या सपोर्ट स्टाफचाही झेल घेतला गेला यावर विश्वास बसला नाही. तुम्ही जेवढ्या वेळा हा झेल पाहाल, तेवढा तो पुन्हा पुन्हा पाहावा, असे तुम्हाला वाटेल.
नामिबियाला १९.३ षटकांमध्ये ९६ धावांत गुंडाळल्यानंतर श्रीलंकेने केवळ १३.३ षटकांमध्ये ३ विकेट्सच्या मोबदल्यात १०० धावा फटकावून हे आव्हान पार केले. या सामन्यातील सामनावीराचा मान थीक्षणा याला देण्यात आले. त्याने चार षटकात २५ धावा देत ३ विकेट्स टिपले. तर हसरंगाने २४ धावा देऊन दोन बळी घेतले.